Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात तंतुवाद्याचा आणखी माहौल बनायला हवा – तालयोगी पं सुरेश तळवलकर

 

पुणे : महाराष्ट्र हा कायमच गायनात अग्रेसर राहिला असून कोलकाता, पश्चिमबंगाल हा प्रांत वाद्यांमध्ये अग्रेसर आहे. मात्र, आता पुण्यात तंतुवाद्याचा आणखी माहौल बनायला हवा. नव्या पिढीतील आश्वासक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत तंतुवाद्य वादनाला प्रोत्साहन दिल्यास कलाकारांना संधी उपलब्ध होऊन विकास होईल आणि वेगळ्या तऱ्हेची क्रांती घडेल, असे प्रतिपादन तालयोगी पं सुरेश तळवलकर यांनी केले.

पुण्यातील इंडी म्युझिकॉन्स व रोहन बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राईज’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत झालेल्या पहिल्या कार्यक्रमात संगीत नाटक अकादमीच्या वतीने नुकताच उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार जाहीर झालेले सरोदवादक सारंग कुलकर्णी यांचा विशेष सन्मान पं तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रियांका बर्वे, व्हायोलिन वादक राजस उपाध्ये व ज्येष्ठ सरोदवादक पं राजन कुलकर्णी आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. पटवर्धन बागेतील सेवाभवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

आमचा भर हा कलाकारांना शिकविण्यावर नसून कलाकार घडविण्यावर असतो असे सांगत पं सुरेश तळवलकर म्हणाले, “शिकविणे हे स्थूल असते तर घडविणे हे सूक्ष्म असते असे मी मानतो. कलाकार घडविताना गुरूलाही आनंद मिळतो. शिष्य जेव्हा व्यासपीठावर सादरीकरण करत असतो तेव्हा आपण कोणत्या दर्जाचा कलाकार घडविला आहे याची प्रचीती गुरूला येते. तेव्हा खरी परीक्षा ही गुरुची असते असे मला वाटते.” आपण वाजवत असलेले वाद्य हा आपला गुरु आहे, काय करायला हवे, कशात स्कोप आहे हे वाद्य आपल्याला सांगत असते, असेही पं तळवलकर यांनी नमूद केले.

यानंतर झालेल्या सानिका कुलकर्णी यांच्या सुमधुर गायनाने आणि सारंग कुलकर्णी यांच्या बहारदार सरोदवादनाने पुणेकरांची सायंकाळ रंगली. कार्यक्रमाची सुरुवात सानिका कुलकर्णी यांच्या गायनाने झाली. त्यांनी यावेळी राग गावती प्रस्तुत केला. सुरुवातीला त्यांनी विलंबित एकतालमध्ये ‘मोरे नंद लाल…’ हा ख्याल सादर केला. ‘अंगीया ना डारो…’ ही छोटा ख्यालमधील बंदिश त्यांनी गायली. तीन तालातील तराणा प्रस्तुत करीत त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. सानिका कुलकर्णी यांना आशय कुलकर्णी (तबला) तर नीलय साळवी यांनी संवादिनीवर साथसंगत केली. यानंतर सारंग कुलकर्णी यांनी राग यमन सादर करीत उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. सारंग यांनी रूपक तालामधील मध्यलयीतील बंदिश आणि द्रुत तीनतालातील बंदिश प्रस्तुत केली. सारंग यांना आशय कुलकर्णी यांनी समर्पक तबलासाथ केली.

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नव्या पिढीतील आश्वासक कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘राईज’ हा उपक्रमाचे हाती घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading