Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

कौशल्य आधारित शिक्षण हेच भारतीय विद्यापीठांचे भविष्य- डॉ. एस. बी. मुजुमदार

पुणे  : सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा 17 वा स्थापना दिवस आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा ८ वा वर्धापन दिन एका विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, किवळे येथील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महानगर आयुक्त आणि पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल महिवाल (आय.ए.एस.),सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजुमदार आणि 

सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रधान संचालक डॉ.स्वाती मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.एस.बी.

 मुजुमदार म्हणाले की,राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे उच्च शिक्षणाचे चित्र बदलणार आहे.बहुआयामी दृष्टीकोन ,भारतीय ज्ञान प्रणाली आणि आधुनिक शिक्षण यावर या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भर आहे.पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्यामध्ये कौशल्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.कौशल्य आधारित विद्यापीठे हे भारतातील भविष्यातील विद्यापीठे असतील,ज्यामुळे या विद्यापीठातून बाहेर पडणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार मिळू शकेल.

ते पुढे म्हणाले की,कौशल्याव्यतिरिक्त शिक्षणात आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ग्रामीण भागातील मुलींचे सक्षमीकरण. उपयुक्त मनुष्यबळ मिळण्यासाठी महिला सक्षमीकरण हे महत्त्वाचे आहे, ही बाब उद्योगांना कळली आहे.त्यामुळे कौशल्य आधारित शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या दुहेरी दृष्टीकोनाला प्रोत्साहन दिले पाहिजे.

महानगर आयुक्त आणि पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल महिवाल म्हणाले की,आपल्या युवकांच्या सकारात्मक उर्जेचा वापर त्यांच्या आत्मविकासासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी आपण करू शकले पाहिजे.त्यासाठी कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून संधी निर्माण करता आली पाहिजे. शासन,उद्योग आणि कौशल्य विद्यापीठे एकत्र येऊन कौशल्यावर काम केल्यास देशाच्या विकासाला अधिक बळ मिळेल.ते पुढे  म्हणाले की,सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ने कौशल्य आधारित शिक्षणासाठी पुढाकार घेणे ही अभिमानाची बाब आहे.

 सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रधान संचालक डॉ.स्वाती मुजुमदार म्हणाल्या की, सिंबायोसिस स्कील्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विद्यापीठ आहे.आमचे ध्येय हे विद्यार्थ्यांना रोजगार कार्यक्षम बनविण्यासाठी किंवा उद्योजक बनविण्यासाठी सुयोग्य कौशल्य प्रदान करणे हे आहे.मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ निर्माण करून स्थानिक उद्योगाच्या आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देणे हे महत्त्वाचे आहे.आमच्या येथील 25 टक्के हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कंपन्या स्थापित करणे हे आमच्या कौशल्य विद्यापीठाचे यश प्रतिबिंबित करते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading