संविधानाच्या रक्षणासाठी बीएसपीला केंद्रात सत्ता द्या – हुलगेश चलवादी
पिंपरी : मागील दहा वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. या काळात भारतीय संविधान अक्षरशः पायदळी तुडवले आहे. या भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आणि उपेक्षित समाज घटकांना न्याय देऊन सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष काशीरामजी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारून बीएसपीचे आम्ही सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी लोकसभा निवडणुकींना सामोरे जात आहे. मायावती यांना पंतप्रधान करण्यासाठी मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या हत्ती चिन्ह समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा. मावळ लोकसभा मतदारसंघातील राजाराम पाटील गेम चेंजर ठरतील असा विश्वास बीएसपीचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी हुलगेश चलवादी यांनी केले.
बुधवारी पिंपरी येथे बहुजन समाज पार्टीच्या (बीएसपी) वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हुलगेश चलवादी बोलत होते. यावेळी मावळ लोकसभेचे बीएसपीचे अधिकृत उमेदवार राजाराम पाटील, बीएसपीचे पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, मावळ लोकसभा प्रभारी सागर जगताप, मावळ लोकसभा अध्यक्ष प्रकाश गायकवाड, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुशील गवळी आदी उपस्थित होते.
चलवादी म्हणाले की, बीएसपीचा लढा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मिलेल्या संविधानाची रक्षा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. तेव्हा भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाज पार्टीला सत्तेत आणणे गरजेचे आहे. देशभरात शिक्षण हक्क कायदा राबवण्यासाठी भाजपा सह काँग्रेसही अपयशी ठरलेले आहे. केजी टू पीएचडी शिक्षण मोफत दिले पाहिजे. ओबीसी, मागासवर्गीय अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. मागील दहा वर्षात बेरोजगारी मध्ये राष्ट्रीय पातळीवर ४० टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे बेरोजगारीला समूळ संपवण्यासाठी शेती व शेतीपूरक व्यवसायांना पूरक धोरणे आणली पाहिजेत. ग्रामीण भागात शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार युवक शहराकडे येणार नाही. तर त्याच्या स्थानिक ठिकाणीच त्याला रोजगार दिला पाहिजे, रोजगार निर्मितीसाठी बीएसपी काम करेल.
जम्मू काश्मीर व ईशान्य भारतातील राज्यांसह भाजपाच्या काळात विविध धर्मांमध्ये तेढ वाढली आहे. राष्ट्राची एकसंधता आणि प्रगती त्यामुळे धोक्यात आली आहे. म्हणूनच सर्व धर्मांमध्ये सलोखा आणि एकोपा निर्माण करण्यासाठी बहुजन समाज पार्टीला सत्ता द्या. इडी, आयटी, सीबीआय या केंद्रीय प्रशासकीय संस्थांना हाताशी धरून, आपल्या विरोधी पक्षांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्याचे काम भाजप करीत आहे. ‘नोटबंदी’ मुळे अर्थव्यवस्थेवर अतिशय वाईट परिणाम झाला. लघुउद्योजक उध्वस्त झाले. भाजपच्या काळात शेतकर्यांच्या आत्महत्त्या प्रचंड वाढल्या आहेत. या निर्दयी सरकारला पायउतार केले पाहिजे. भाजपने माध्यमांना वेठीला धरले आहे आणि स्वतःला अनुकूल अश्या बातम्या पसरविण्याचा उद्योग ते करत आहेत असेही चलवादी म्हणाले.
राजाराम पाटील यांनी सांगितले की, अल्पसंख्यांक आणि विशेषतः दलितांवरील अत्याचार भाजप शासनकाळात लक्षणीयरित्या वाढले आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निळा झेंडा व हत्ती हे चिन्ह घेऊन बसपा लोकसभेच्या निवडणुकीत सर्व शक्तीनिशी उतरला आहे. संसदेत कोणतीही चर्चा न करता अध्यादेशांद्वारे राज्य करण्यास प्राधान्य देणाऱ्या या केंद्र सरकारने संसदेचा अवमान केला आहे. तेव्हा संसदेचा सन्मान वाढवण्यासाठी बहन मायावतींच्या बहुजन समाज पार्टीला बहुमताने विजय करण्याचा निर्धार मावळ सह देशभरातील सुज्ञ मतदारांनी केला आहे.
