Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

बँडच्या गजरात भाचे मंडळींचे मामाच्या गावी जंगी स्वागत 

पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद… दरवर्षीप्रमाणे मामाच्या गावी जाण्याची चाहूल…शेवटी गावी पोहोचल्यावर केलेला जल्लोष आणि मामांनी देखील बँडच्या गजरात केलेले भाच्यांचे जंगी स्वागत… मुलांचे भरभरून झालेले कोडकौतुक… अशा निरागस चेहऱ्यावरील हास्याने भारलेल्या वातावरणात फुगे, टोप्या आणि चॉकलेट देऊन भाचे मंडळींचे स्वागत झाले.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने विविध संस्थांमधील वंचित विशेष मुलांसाठी मामाच्या गावची सफर हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी पद्मभूषण प्राप्त दिग्दर्शक राजदत्त, शि.प्र. मंडळीचे  सुधीर काळकर यांनी मुलांचे स्वागत केले. कीर्तनकार चारुदत्त आफळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ,  भक्ती मायाळू,  पराग ठाकूर, हेमंत मावळे, डाॅ. मिलिंद भोई, शिरीष मोहिते, अध्यक्ष गणेश सांगळे, अमर लांडे, सचिन ससाणे, विक्रांत मोहिते, उमेश कांबळे, मित नानावटी, नमन कांबळे,  यश सावंत, साहिल आंबेडकर, स्वाती महाले, माधवी महाले, दर्शनी ससाणे, पराग शिंदे यावेळी उपस्थित होते.  शुक्रवार पेठेत सेवा मित्र मंडळ चौकात दि. ७ ते १२ मे पर्यंत हा उपक्रम होणार आहे.

भाचे मंडळींच्या जंगी स्वागतानंतर नाच रे मोरा… झिंगाट च्या तालावर मुले मनसोक्त नाचली. उंट आणि घोड्यावरून तसेच बग्गीतून रपेट मारत चॉकलेट खाण्याचा आनंदही त्यांनी लुटला.  मनसोक्त  हसणारी, दंगा करणारी मुले पाहणे हा उपस्थितांसाठी देखील आनंदाचा क्षण होता.

राजदत्त म्हणाले, मामाच्या गावची सफर या उपक्रमाच्या निमित्ताने अकल्पीत आनंद मिळाला आहे. मागील २५ वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. समाजाच्या, माणसाच्या जीवनातील दुःख कमी करण्याचा हा प्रयत्न आहे, ही गोष्ट साधी आहे तितकीच महत्त्वाची देखील आहे.

पुण्यातील आपलं घरं, संतुलन पाषाण, श्रीवत्स, वंचित विकास, बचपन वर्ल्ड फोरम, माहेर, संकल्प वसतिगृह – पारधी समाज विकास संस्था, ममता फाऊंडेशन, संस्कार विद्यार्थी गृह राशीन आदी संस्थातील मुले सहभागी झाली आहेत.

मामाच्या गावची सफर या उपक्रमासोबतच दृष्टीहिन असलेल्या जोडप्यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन देखील केले जाते. लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था यांच्या समवेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. मामाच्या गावची सफर या उपक्रमाचे यंदा रौप्यमहोत्सवी (२५) वर्ष आहे.

विवाहपूर्व मेहंदीचा कार्यक्रम बुधवार, दि. ८ मे रोजी सायंकाळी ७ होणार आहे. रौप्यमहोत्सवानिमित्त स्मरणिका तयार करण्यात आली असून प्रकाशन बुधवारी सायंकाळी होणार आहे. तर, रविवार, दि. १२ मे रोजी साखरपुडा, हळदी समारंभ आणि त्यानंतर नवरदेवाची वरात दुपारी ४.३० वाजता व विवाहाचे धार्मिक विधी होणार आहेत. मुख्य विवाह सोहळा सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. यावेळी सामाजिक, राजकीय व प्रशासकीय सेवेतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बुधवार, दि.८ मे रोजी मुलांना वॉटर पार्क आणि विविध प्रेक्षणीय स्थळांची सफर घडविण्यात येणार आहे. तर, गुरुवार, दि. ९ मे रोजी पुण्यातील धार्मिक स्थळांना भेटा त्यानंतर जादूचे प्रयोग, कटपुतली खेळ, बालनाटय, चित्रपट तसेच विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सायंकाळी ५ वाजता समारोप होणार आहे.
शुक्रवार, दि.१० मे रोजी अक्षय्यतृतीयेला मंदिर वर्धापनदिनानिमित्त धार्मिक विधी व सायंकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार, दि.११ मे रोजी मंदिर परिसरात आरोग्य शिबीर व भारतीय वारकरी मंडळातर्फे भजन होणार आहे. अनाथ आश्रमातील मुले-मुली मामाच्या गावच्या सफरीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी आतुरतेने वाट पहातात. दोन ते तीन दिवस भाचे मंडळी मुक्कामी असतात. अनाथ आणि विशेष मुलांना मामाच्या गावी येऊन सुट्टीमध्ये मजा करता यावी, यासाठी उपक्रमाचे आयोजन केले जाते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading