Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRA

ते बोलतात जास्त अन् बापाच्या जीवावर मतं मागतात; महादेव जानकर यांची ओमराजेंवर सडकून टीका

धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघात येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात महायुतीचा प्रचार जोमात सुरू आहे  आमदार राणा जगजितसिंह  हा मितभाषी माणूस आहे. हा बोलतो कमी अन् काम जास्त करतो.  तर दुसरीकडे ओमराजेंबद्दल बोलायलाच नको. ते बोलतात जास्त अन् बापाच्या जीवावर मतं मागतात. अशा माणसांमुळे आपली प्रगती होणार नाही, अशी टीका रासप नेते महादेव जानकर यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली.

धाराशिव येथील लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत जानकर बोलत होते.

पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले, तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच  होणार आहेत. त्यांच्या कडून निधी आणणारे डबल इंजिन सरकार महायुतीच्या रूपाने राज्यात आहे. आज धाराशिव भागात पाण्याचा, एमआयडीसी, रेल्वेचा, मेडिकल कॉलेजचा प्रश्न आहे. तो सोडवायचा असेल तर केंद्रातून निधी आणणे गरजेचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा महायुतीच्या विचारांचा खासदार संसदेत जाईल. विरोधी विचारांचा खासदार गेल्यास आपल्या भागात विकासकामांसाठी निधी येणार नाही. विकास करायचा असेल तर राज्यात आणि केंद्रात आपल्या विचारांचे सरकार आवश्यक आहे.

जानकर म्हणाले, मी महायुतीचा आभारी आहे की त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) एक जागा दिली. त्यामुळे मी आता चांगल्या मताधिक्याने निवडून येईल, अशी मला खात्री आहे. ही लढाई नरेंद्र मोदी की राहूल गांधी अशी आहे असे बोललं जात आहे. पण नक्की पंतप्रधान राहूल गांधी होणार की आणखी कोणी? हे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना देखील माहीत नाही. तेव्हा धाराशीवच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ घालवायचा असेल तर, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मतं द्या, विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा,असे आवाहन महादेव जानकर यांनी मतदारांना केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading