…. त्यामुळे मला गावापासून शहरापर्यंतच्या प्रश्नांची जाण – सुनेत्रा पवार
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातही प्रचाराचा तोच जोश कायम ठेवला आहे. प्रचाराच्या शेवटातही सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील गाव भेटी दौऱ्यावर जोर दिला आहे. अशातच आता सुनेत्रा पवार यांनी दौऱ्याच्या वेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, माझ्या सामाजिक कार्याची सुरुवातच काटेवाडी गावातून केली आहे. त्यामुळे मला गावापासून शहरापर्यंतच्या प्रश्नांची जाण आहे. या प्रश्नांची सोडवणूक करणं ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवूनच मी काम करत राहीन, अशी ग्वाही देखील सुनेत्रा पवार यांनी मतदारांना दिली. अजित पवारांचा वादा आणि मोदींची गॅरंटी याचा रोज प्रचारादरम्यान प्रत्यय येत आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. पण तुम्ही आम्हाला मतदान करुन विजयी करा, असं अस म्हणत सुनेत्रा पवारांनी अजितदादांसमोरच मतदारांना आवाहन केलं.
सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणुक व्हावी, हा अजितदादांचा आग्रह असतो. त्यांच्या कामाचा आवाका आणि पद्धत ही संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे. त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास हाच मुद्दा घेवून ही निवडणूक लढवत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्नांची सोडवणूक करण्यावर आपला भर असेल असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीची वज्रमूठ घट झाल्याचं आपण पाहतो. ही एकजूट कायम ठेवून सर्वांनी आपल्या भागातून घड्याळाला अधिकाधिक मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या उज्वल भवितव्यासाठी घड्याळाला अधिकाधिक मतदान करुन आपल्या हक्काच्या व्यक्तीला खासदार म्हणून तुम्ही संसदेत पाठवाल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी दौऱ्यादरम्यान, नागरीकांच्या भेटी घेवून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी नागरीकांच्या अडचणी समजून घेवून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
