मी साहेबांना कधीही सोडलं नाही …; अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत
इंदापूर : राज्यात वाढत्या तापमानाच्या पाऱ्याप्रमाणे राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे. पण सर्वात जास्त राजकीय तापमान वाढलंय ते बारामती लोकसभा मतदार संघात. कारण येथे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. त्यामुळे अजित पवार विरुद्ध शरद पवार असे चित्र पाहायला मिळत आहे. प्रचाराच्या प्रत्येक ठिकाणी पारावर, चौका चौकात ‘अजित पवारांनी साहेबांना या वयात सोडायला नको होतं’ ही एकच चर्चा आहे. त्यावर अजित पवार यांनी इंदापूरच्या सभेत उत्तर दिल. सध्या त्यांचे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
अजित पवार म्हणाले, ही निवडणूक गावकी – भावकीची निवडणूक नाही. देशाचा पंतप्रधान आपल्याला निवडायचा आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत की राहुल गांधी हा निर्णय घेण्याची ही निवडणूक आहे हे विसरु नका. बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळे होण्याचा निर्णय का घेतला?. आपण सगळ्यांनी माझी कारकीर्द पाहिली आहे. १९८४ मध्ये भवानीमाता पॅनल केलं होतं तिथे मला संचालक तुम्ही केलंत. तिथून माझी राजकीय सुरवात झाली. राजकारणात येईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण एक घाव दोन तुकडे हा माझा स्वभाव आहे. एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो, नसेल होणार तर नाही सांगतो. मला उगाच कुणाला हेलपाटे घालून द्यायला आवडत नाही. ”
पुढे बोलताना ते म्हणाले, काही जण म्हणतात या वयात दादांनी साहेबाला सोडायला नको होतं, पारावर अशी चर्चा करतात. मित्रांनो मी साहेबांना कधीही सोडलं नाही. १९८७ पासून २०२३ पर्यंत साहेब (शरद पवार) म्हणतील ती पूर्व दिशा. मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो. लहान असताना आजी आजोबांनी सांगितलं होतं आपलं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं. स्वर्गीय वसंत दादा पवार हे पोटनिवडणुकीला उभे होते. त्यावेळी शरद पवार हे महाविद्यालयात होते. त्यावेळी शरद पवारांनी आमच्या थोरल्या काकांना विरोध केला. अख्खं पवार कुटुंब शेकापच्या बाजूने होतं. त्यावेळी शरद पवारांनी विरोधी काम केलं. ही सुरुवात झाली. त्यानंतर १९६७ मध्ये शरद पवार उभे राहिले. प्रत्येकाला संधी मिळते. हर्षवर्धन पाटील यांनाही नंतर संधी मिळाली. शरद पवारांनी मला संधी दिली. शरद पवारांना यशवंतराव चव्हाणांनी निवडणुकीची संधी दिली होती.
