Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

नरेंद्र मोदींच्या सभेने पुण्यात ‘राजकीय तापमान’ वाढणार

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक ठिकाणी जाहीर सभा होत असल्याचे मागील काही दिवसापासून राज्यात सुरू आहे. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील मतदारसंघातील उमेदवारांसाठी, आज परभणी आणि नांदेड येथे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. यातच आता पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा राजकीय होण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून आपपल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला जात आहेत. अशातच येत्या २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत. पुण्यातील एसपी कॉलेज मैदानावर मोदींची जाहीर सभा पार पडणार आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचा रोड शो वगैरे होणार नसून मोठी सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणेकरांना काय आवाहन करणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधी नरेंद्र मोदी यांनी पुण्यात दोनदा येऊन गेले आहेत. त्यावेळी त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध दगडुशेठ गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी पुण्यात लोकांनी फार मोठी गर्दी केली होती. तर अलिकडेच झालेल्या विदर्भातील सभांना नरेंद्र मोदी यांना मोठा प्रतिसाद दिसून येत आहे. यातच आज झालेल्या नांदेड येथील सभेलाही लोकांनी फार मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पुण्यात देखील मोदींच्या सभेला गर्दी होण्याची शक्यता असून त्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, मनसेचे माजी नगरसेवकर वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्यात तिरंगी झाली आहे. यातच कॉंग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी पुण्यात सभा घेणार आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे राज्यातील नेते देखील येणार असल्याची माहिती आहे. तर वसंत मोरेंसाठी वंचितचे नेते देखील पुण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसात पुण्यात राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading