Sunday, October 4, 2026
Latest NewsPUNE

माझ्यातील सुजाण-सगज वाचक आई-वडिलांनी घडविला : गौरी देशपांडे

पुणे : आईने वैचारिक पुस्तकांची ओळख करून दिली व माझ्यातील सुजाण आणि सजग वाचक घडविला. काय वाचावे आणि कसे वाचावे याचे संस्कार बालपणापासूनच झाले, अशा भावना गौरी देशपांडे हिने व्यक्त केल्या. बालपणापासूनच वाचनाची आवड आहे. पूर्वी मी आधुनिक तंत्राचा वापर करून वाचन करीत होतो. परंतु चित्रपटासाठी म्हणून श्यामची आई पुस्तक पहिल्यांदा वाचले आणि आता पुस्तके हाताळायलाही आवडते आहे, असे शर्व गाडगीळ याने सांगितले.

पुस्तक वाचन चळवळ राबविणाऱ्या ‌‘भावार्थ’ आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या बालसाहित्य महोत्सवातील दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) साधना प्रकाशनतर्फे ‌‘श्यामची आई’ चित्रपटातील गौरी देशपांडे (आई) आणि शर्व गाडगीळ (श्याम) यांच्याशी गप्पा-गोष्टींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी गौरी आणि शर्व यांनी मराठी साहित्य वाचनाबरोबरच चित्रपटातील भूमिकांचा प्रवास उलगडून दाखविला. त्यांच्याशी भावार्थच्या व्यवस्थापिका कीर्ती जोशी यांनी संवाद साधला. भावार्थचे सल्लागार प्रसाद मिरासदार, संवाद पुणेचे सुनील महाजन, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, बालसाहित्यकार राजीव तांबे, भावार्थचे संस्थापक प्रसन्न करंदीकर आदी उपस्थित होते. ‌‘भावार्थ साहित्य दालन’, सक्सेस स्क्वेअर, कर्वेपुतळ्याजवळ, कोथरूड येथे बालसाहित्य महोत्सव सुरू आहे.
चित्रपटातील भाषा, व्यक्तिमत्त्व साकारताना आलेले अनुभव कथन करताना गौरी म्हणाली, मी पुस्तकाचे अनेकदा वाचन केले. संहिता समजावून घेतली. चित्रपटातील प्रसंग समजावून घेत एकत्रितपणे चर्चा करून शंभर वर्षांपूर्वी वापरात असलेल्या भाषेचा सराव केला. तालमी करताना मी व शर्वने एकत्रितपणे घालविला वेळ भूमिका निभावताना उपयोगी पडला व आमच्यात अनुबंध निर्माण झाले. आम्ही दोघे मित्रत्वाने वागत होतो, एकमेकांची ओळख करून घेत होतो त्यामुळे प्रत्यक्ष चित्रिकरण प्रसंगी चित्रपटात शंभर वर्षांपूर्वी बोलली जाणारी भाषा परकी वाटली नाही. श्यामच्या आईची भूमिका करताना खूप वेदना, आनंद, भावनिकता यांचे मिश्रण मनात होते आणि संहितेमुळे पुस्तकाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला.
सुजाण पालकत्वाविषयी काहीही लिहिले जात नसतानाच्या काळात आपले प्रत्येक मुल हे स्वतंत्र आहे, त्याची जडणघडण, त्याची भावनिक-मानसिक गरज वेगवेगळी असू शकते हे ओळखून वागणारी श्यामची आई साकारताना माझ्याही विचारात बदल घडले. सर्व बाजूंनी खोलवर विचार करण्याची प्रक्रिया प्रगल्भ झाली, असे गौरी म्हणाली.
शर्व म्हणाला, लहानपणापासूनच नाटक, नृत्य तसेच विविध कलास्पर्धांमध्ये भाग घेत होतो. आई-बाबा दोघेही कला क्षेत्रात असल्याने मला भाषेची आवड निर्माण झाली. चित्रिकरणादरम्यान शाळेचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्याने आवजूर्न सांगितले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सगळ्यांनी कौतुक केले. श्याम या भूमिकेचा प्रभाव काही दिवस टिकून होता पण त्यानंतर शर्व म्हणून वावरण्यात काही अडचण आली नाही. भाषेच्या आवडीमुळेच आजही कवितावाचन, अभिवाचन आवडीने करत आहे. तसेच क्रिकेट, फुटबॉल, टेबलटेनिस हे खेळ खेळणे आणि स्क्रिन बघणेही आवडते, असे त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
ऐकणे, बोलणे, लिहिणे, वाचणे हे भाषेचे महत्त्वाचे पैलू आहेत. मातृभाषेचे महत्त्व लक्षात घेऊन पालकांनी मुलांना नकळत्या वयापासूनच गोष्टी सांगून, मुलांसोबत वाचन करून मोबाईल युगात पुस्तकांची गोडी लावणे आवश्यक आहे. मोबाईल हातातून काढून पुस्तक देणे हे वाचनाविषयी अरुची निर्माण करू शकते, असे गौरी हिने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. श्रद्धा मयेकर यांनी प्रास्ताविक केले तर सत्कार कार्यकारी व्यवस्थापक पंकज कुरटे यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading