सागर विधायकही आणि विनाशकही, आपली दृष्टी महत्त्वाची
मॉरिशसचे माजी उच्चायुक्त आणि ब्ल्यू इकोनॉमी टास्क फोर्सचे सदस्य अनुप मुदगल यांचे प्रतिपादन
पुणे : पृथ्वीवर महासागर ही मानवाला लाभलेली महत्त्वाची देणगी आहे. महासागर हे विधायकही आहेत आणि प्रसंगी विनाशकही आहेत. त्यामुळे महासागरांकडे पाहण्याची आपली दृष्टी महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मॉरिशसचे माजी उच्चायुक्त आणि ब्ल्यू इकोनॉमी टास्क फोर्सचे सदस्य अनुप मुदगल यांनी मंगळवारी केले.
मेरिटाईम रिसर्च सेंटरतर्फे आयोजित पाच दिवसीय कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते. ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस फ्रेमवर्क फॉर स्ट्रॅटेजिक सिक्युरिटी आर्किटेक्चर अॅंड आत्मनिर्भरता’, असा या कार्यशाळेचा विषय असून नीरध्वनी टेक्नालाॅजी प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडो स्विस सेंटर ऑफ एक्सेलन्स यांचे सहकार्य या कार्यशाळेसाठी लाभले आहे. सेनापती बापट रस्त्यावरील एमसीसीआयएच्या नवलमल फिरोदिया सेमिनार हॉल मध्ये सदर कार्यशाळा संपन्न होत आहे.
याप्रसंगी अँडव्हान्स टेक्निकल व्हेसल्स प्रोग्रॅमचे माजी महासंचालक अॅडमिरल डीएसपी वर्मा, एमआरसीच्या ब्ल्यू इकाॅनामीचे सल्लागार प्रफुल तलेरा तसेच एमआरसीचे संस्थापक संचालक कमांडर डॉ अर्णव दास आदी मान्यवर उपस्थित होते.
महासागरांच्या भू-राजकीय वैशिष्ट्यांची उकल करत मुदगल पुढे म्हणाले, “सागर हा जैविक घटक भारतीय मानसिकतेशी जवळीक साधणारा आहे. ‘सागर’ हे सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन’ या संकल्पनेचे संक्षिप्त रूप म्हणून रूढ झाले आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भारतीय ज्ञानपरंपरेच्या तत्त्वाशी ते निगडीत आहे आणि सदैव राहील. त्यामुळे सागर ही परिकल्पना एका विशिष्ट प्रदेशापुरती आणि विशिष्ट काळापुरती मर्यादित नाही. सागर हा शाश्वत विचार आहे, जो भारतीय मनात सदैव रुजलेला आहे.”
सागराचे महत्त्व सांगताना मुदगल म्हणाले, बाह्य आक्रमणांपासून नैसर्गिक संरक्षण एवढ्यापुरते सागरांचे महत्त्व मर्यादित नाही. सागर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आज भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ५० टक्क्यापेक्षा अधिक भाग अशा घटकांपासून मिळतो, ज्या मोठ्या प्रमाणात सागरांवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत सागर महत्त्वाचे नाहीत, असे आपण म्हणूच शकत नाही. सागर हे स्वतःमध्येच अपरिमित स्रोतांचे भांडार आहे. तसेच अन्य कित्येक स्रोतांसाठी ते पूरक असतात, आधारभूत असतात.”
अन्न, उर्जा, खनिजे, व्यापार, औषधे, जैवविविधता, समुद्रतळातील खनिजसंपत्ती हे अनुभवत असताना सागर महत्त्वाचे नाहीत, असे आपण कसे म्हणू शकतो, असा प्रश्न मुदगल यांनी केला.
याशिवाय औद्योगिक आणि तंत्रज्ञानाच्या महाक्रांतीच्या युगात वावरताना सगळ्यांना भेडसावणारी जागतिक तापमानवाढ रोखण्याचे सामर्थ्यही सागरातच आहे. इथेही सागराचे विधायक आणि विनाशक रूप मानवाने लक्षात घेतले पाहिजे. सागर जागतिक तापमानवाढ रोखूही शकतात आणि वाढवू देखिल शकतात. सागर सर्वाधिक प्रमाणात कार्बन शोषून घेतात, पण त्यासाठी सागरांचे आरोग्य राखणे ही आपली जबाबदारी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आपण सागराच्या आरोग्याची काळजी घेतली, तर सागरही कार्बन शोषून आपल्या आरोग्याची काळजी घेतात. पण आपण बेजबाबदारपणे वागत आहोत, आणि तरीही सागराने मात्र जबाबदारीनेच वागले पाहिजे, अशी अपेक्षा करत आहोत, हा विरोधाभास आहे, याचा उल्लेख मुदगल यांनी केला.
सागराने न शोषलेला कार्बन पुन्हा वातावरणात येईल आणि क्रुद्ध सागरासोबत आपण जिवंत राहू शकत नाही, हे वास्तव मुदगल यांनी अधोरेखित केले. सागराचे आरोग्य जपणे हे आपले काम आहे, मग तो सागर आपले संरक्षणही करेल, आपल्याला अखंडित स्रोतांद्वारा पुरवठा करत राहील. याविषयीची जाणीवजागृती करण्यासाठीच ‘सागर’ ची निर्मिती करण्यात आली आहे, असेही मुदगल यांनी सांगितले.
कमांडर डॉ अर्णव दास यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत अनुप मुदगल यांचे स्वागत केले.
