भाजपाने कधीही धर्मनिरपेक्ष विचार बाजूला करा असे म्हंटले नाही – सुनील तटकरे
दापोली : भाजपाने कधीही धर्मनिरपेक्ष विचार बाजूला करा असे आम्हाला महायुतीत घेताना म्हटलेले नाही, परंतु जे आयुष्यभर एका धर्माचा द्वेष करत आले तेच आज निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेचे लांगूलचालन करत आहेत. मात्र यांच्यापासून सावध व्हा असे आवाहन आज दापोली येथील अल्पसंख्याक मेळाव्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केले.
रायगड लोकसभा मतदार संघातील दापोली येथे दुसरा अल्पसंख्याक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळी तटकरे बोलत होते.
पुढे बोलताना तटकरे म्हणाले, आखाती देशात जाणारा माझ्या मुस्लिम तरुणाने इथेच नोकरीधंदा करावा, त्यानेच इथेच रहावे यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून अनेक योजना व उद्योगधंदे आणण्याचे काम करणार आहे. कुणबी समाजाचे नाव घेऊन अनेक निवडणूका अनंत गीते यांनी लढवल्या मात्र ४० वर्षांपासून कुणबी समाजोन्नती संघाचा रखडलेला भूखंड आणि इमारतीचे काम त्यांना करता आले नाही. मात्र हे काम आदरणीय अजितदादा पवार यांनी तात्काळ पूर्ण केले. सर्वांचा विश्वास जिंकत या मतदारसंघात काम केले आहे. त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याची संधी द्यावी, असे आवाहन तटकरे यांनी केले.
यावेळी अल्पसंख्याक सेलचे निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी, कार्याध्यक्ष वसीम बुर्हाण,दापोली उपनगराध्यक्ष खालीद रखांगे, विधानसभा क्षेत्रप्रमुख मुजीब रुमाणे, तालुकाध्यक्ष जयवंत जालगांवकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
