fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

शिरूरमध्ये ठाकरे गट आक्रमक, नियोजित दौरा रद्द करण्याची कोल्हेंवर नामुष्की ओढावली

 

राजगुरूनगर : खेड तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागावाटपात खेड-आळंदी विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला मिळावी, यासाठी आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांशी विचारविनिमय करून शब्द द्यावा. तोपर्यंत आपल्या प्रचारात सहभागी होणार नाही. अशी स्पष्ट भूमिका ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमोल कोल्हे यांना सांडभोरवाडी काळुस जिल्हा परिषद गटातील शुक्रवारी नियोजित असलेला दौरा तातडीने रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे मतदारसंघात आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे खेड आळंदी विधानसभा समन्वक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांनी पाच दिवसांपुर्वी भाजपला राम राम ठोकला. तर शुक्रवारी त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सर्व प्रक्रियेत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी प्रमुख भूमिका बजावली होती.

या प्रवेशामुळे कोल्हे यांनी देशमुख यांना विधानसभेचा शब्द दिला असावा. असे संकेत मिळत मिळाल्यानंतर ठाकरे गटात अस्वस्थता पसरली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर संध्याकाळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट कोल्हे यांचं घरं गाठलं. या बैठकीत शिवसैनिकांकडील इच्छूक उमेदवारांपैकी भलतीच नावं पुढे केल्याचं समजत आहे. ही सर्व बैठक गुपित झाली. मात्र खात्रीशीर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची पाहता कोल्हेंना आपला प्रचार थांबवण्याची नामुष्की ओढावली आहे. आता या मतदारसंघात आघाडीत निर्माण झालेला पेच कोल्हे आणि नेते मंडळी कशा पद्धतीने सोडवतात. याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. यातच विधानसभेसाठी खेड-आळंदीची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना देण्याचा शब्द वरिष्ठ नेत कार्यकर्त्यांना देणार का ? आणि तसे झाल्यास इतर पक्षातून नव्याने सामील झालेल्या इच्छुकांचे काय होणार ? याकडे आता मतदारसंघांंचं लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading