भाजप उमेदवार नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : अमरावती (Amravati)च्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र आज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढविण्याचा नवनीत राणा यांचा मार्ग सोपा झाला आहे. न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
सात वर्ष चालला खटला
राणा यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. जात प्रमाणपत्र समितीसमोरही त्यांनी खोटा जातीचा दाखला दिलेला आहे, असा आरोप करीत माजी खासदार आनंदराव अडसूळ (Aanadrav Adsul) आणि सुनिल भालेराव (Sunil Bhalerav) यांनी २०१७ मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने ८ जून २०२१ रोजी राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवत दोन लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. त्या निर्णयाला राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज निकाल आला असून खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र आज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे.
