Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मातोश्रीवर मिळणारा सन्मान हेमंत पाटलांना पचवता आला नाही – अंबादास दानवे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोली मतदारसंघात बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जाहीर उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. परंतु, यामुळे विरोधकांच्या विशेषतः ठाकरे गटाच्या हाती आयते कोलीत लागले असून त्यांच्याकडून याबाबत टीका करण्यात येत आहे. आता कुठे जाणार गद्दारांनो?  अशी पोस्ट  ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. 

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनीच हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध केल्याने   शिंदे यांच्यावर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली असल्याची सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी X या सोशल मीडिया साइटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून याबाबतची पोस्ट करत शिवसेनेला डिवचण्याचे काम केले आहे.

शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत, अशी जहरी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. तसेच, जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपाचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धवसाहेबांवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही, आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो? असे म्हणत दानवे यांनी हेंमत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

तसेच, लोकसभा हा तर ट्रेलर आहे.. तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील.., असेही अंबादास दानवे यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading