महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी
प्रा. जोशी म्हणाले, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या निधनानंतर दीपक करंदीकर, उद्धव कानडे या स्थानिक कार्यवाहांचे झालेले आकस्मिक निधन हा परिषदेसाठी मोठा धक्का होता. हे तीनही पदाधिकारी सांभाळत असलेले विभाग अतिशय महत्त्वाचे असल्याने व परिषदेचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी त्यांची रिक्त झालेली पदे भरण्याचा विषय कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या विषय पत्रिकेवर घेण्यात आला. घटनेतील तरतूदीनुसार आणि घटनेने कार्यकारी मंडळाला दिलेल्या अधिकारानुसार या रिक्त झालेल्या जागा भरण्यात आल्या आहेत.
प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर सुनिताराजे पवार यांची निवड झाल्यामुळे त्या काम करत असलेले कोषाध्यक्षपद रिक्त झाले होते. कोषाध्यक्षपदी सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि जनता सहकारी बँकेचे माजी चेअरमन विनोद कुलकर्णी यांची कार्यकारी मंडळाने एकमताने निवड केली. स्थानिक कार्यवाह (स्मृतिदिन, व्याख्याने) दीपक करंदीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस यांची स्थानिक कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली. स्थानिक कार्यवाह (वार्षिक ग्रंथ पारितोषिके) उद्धव कानडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांची स्थानिक कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली. स्थानिक कार्यवाह बंडा जोशी (विशेष ग्रंथ पारितोषिके) यांनी आजारपणामुळे दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी कवयित्री मृणालिनी कानिटकर यांची स्थानिक कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली. पुणे शहर प्रतिनिधी डॉ. अरविंद संगमनेरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे शहर प्रतिनिधीच्या जागेवर प्रसिद्ध लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांची निवड करण्यात असून शिरीष चिटणीस यांची स्थानिक कार्यवाहपदी निवड झाल्यामुळे रिक्त झालेल्या पुणे शहर प्रतिनिधीच्या जागेवर ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांची निवड करण्यात आली. या निवडींमुळे ६ कार्यवाहांपैकी २ कार्यवाहांची पदे आणि एक शहरप्रतिनिधींचे पद यावर महिलांची निवड झाल्यामुळे त्यांचा कार्यकारी मंडळातील सहभाग वाढला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर साहित्य परिषदेचे तिसरे प्रतिनिधी म्हणून राजन लाखे यांची १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीसाठी बहुमताने निवड करण्यात आली. याच कालावधी साठी जयंत येलुलकर व जे. जे. कुळकर्णी यांची विभागीय कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे असे प्रा. जोशी यांनी स्पष्ट केले.
