Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

नद्यांना पुनर्सन्मान प्राप्त होणे गरजेचे : परिणिता दांडेकर

 

पुणेः- भारत हा मुळात उत्सवांचा देश असून निसर्गाच्या अनेक घटकांशी सहसंबंध प्रस्थापित होतील, अशा अनेक उत्सवांचे मूळ भारतात आढळते. नद्यांना जीवनवाहिनीचे महत्त्व दिलेले असताना त्यांचे होणारे बेसुमार प्रदूषण मनुष्यजातीच्या अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. मनुष्याचे अस्तित्व आबाधीत राखण्यासाठी  नद्यांना पुनर्सन्मान प्राप्त होणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध नदी अभ्यासक आणि साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पिपलच्या असोसिएट कोऑर्डीनेटर परिणीता दांडेकर यांनी व्यक्त केले. 
राम नदीशी नाते निर्माण व्हावे, तिच्या जैवविविधतेचा अभ्यास व्हावा, तिची स्वच्छता राखण्यासाठी तरुण पिढी प्रेरीत व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘राम नदी पुनरूज्जीवन अभियान‘ला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित चौथ्या ऑनलाईन ‘किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सवा’चे उद्घाटन आज परिणीता दांडेकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाच्या निमंत्रक आरती किर्लोस्कर, किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष आर. आर. देशपांडे, किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे फॅसिलिलेटर आनंद चितळे आणि क्यूरेटर डॉ. गुरूदास नूलकर उपस्थित होते. 
यावेळी बोलताना परिणीता दांडेकर म्हणाल्या की, मानवी संस्कृती नद्यांच्या किनारी वसली, वाढली आणि फलद्रूप झाली. नद्यांनी कायमच मनुष्याच्या सर्वांगीण उत्थानासाठी सहाय्यभूत भूमिका निभावली. पंरतु, मनुष्य स्वभावाच्या कृतघ्न वृत्तीमुळे नद्यांचे नानाविध मार्गाने बेसुमार प्रदूषण करीत नद्याच्या अस्तित्वाविषयीच आपण प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुण्यातून वाहणाऱ्या राम नदीचे होणारे प्रदूषण हा चिंतेचा विषय असून या नदीच्या सभोवताली वाढणारे शहरीकरण नदीच्या प्रदूषणात भर घालत आहे. नद्यांच्या किनारी वाढणारे शहरीकरण आणि अतिक्रमणामुळे नद्यांची पात्रे अरूंद आणि प्रदुषित होत आहेत. स्थानिक पुणेकरांनी तसेच राम नदीच्या किनारी वसलेल्या नागरिकांनी आपला एक दबाव गट तयार करून राम नदीवर सुएझ प्लान्ट बसविण्या संदर्भात पुणे महानगर पालिकेवर दबाव वाढवावा. शहरातून वाहणाऱ्या या नद्यांचे लोकसहभागातून आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पुनरूज्जीवन होणे आवश्यक असल्याचे मत दांडेकर यांनी यावेळी व्यक्त केले. 

यावेळी बोलताना किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे फॅसिलिलेटर आनंद चितळे म्हणाले की, नदीच्या पुनरूज्जीवनासाठी एक सर्व समावेशक व शाश्वत प्रारूप तयार करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे हा महोत्सव आहे. ‘राम नदी पुनरूज्जीवन अभियान‘मार्फत गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांवर तसेच नदी समस्यांवर आधारित चित्रपट हे महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. नदीचे प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, ‘फ्लोटिंग बेड‘ व ‘रीड बेड‘च्या सहाय्याने पाण्याचे शुध्दीकरण, राम नदी परिक्रमा, वृक्षारोपण व संवर्धन, शाळांतील भित्ती चित्रे, ‘फोटोवॉक‘, भारतीय कमळांचे रोपण, स्वच्छता अभियान, रसायनमुक्त शेती, शिक्षकांचे प्रशिक्षण इत्यादी अनेक उपक्रमांचे दर्शन चित्रपटांव्दारे घडणार आहे. राम नदी विषयक कल्पक उपक्रम, कार्यशाळा व निसर्ग परिक्रमांवर आधारित चित्रपटांचा देखील समावेश या महोत्सवात करण्यात आला आहे. यात राम नदीची ओळख, सफर पाषाण येथील सोमेश्वर मंदिराची, राम नदीचे भूजल व्यवस्थापन इ. चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
यावेळी बोलताना  किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले की, सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या 19.2 किमी. लांबीच्या राम नदीचा प्रवाह पूर्वीप्रमाणे जास्तीत जास्त शुध्द व्हावा आणि ती अविरल व निर्मख व्हावी या उद्देश्याने आम्ही काम करीत आहोत. अशा नद्या शांतता प्रिय आणि आनंदी समाज घडविण्यासाठी मदत करतील तसेच भावी पिढ्यांसाठी समृध्द निसर्ग निर्माण करतील असे आम्हाला वाटते.
दिनांक २८ मार्च पर्यंत हा ऑनलाईन महोत्सव होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ ते १२ या वेळेत त्याचे प्रसारण होईल, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत त्याचे पुनर्प्रक्षेपण होणार आहे. हा महोत्सव विनामूल्य खुला असून किर्लोस्कर वसुंधराच्या ‘KirloskarVasundhara’-  https://www.facebook.com/kirloskarvasundharafilmfest  या फेसबुक पेजवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या महोत्सवात निमंत्रक आरती किर्लोस्कर आणि इकोलॉजिकल सोसायटीचे गुरूदास नूलकर यांच्यासह अन्य पर्यावरण तज्ज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. 
या महोत्सवात आज गोपी सुंदर, महेश पानपालिया, प्रीती महेश, डॉ. निर्मल राघवन आणि अदिती देवधर, अन्नपूर्णा कामत या पर्यावरण प्रेमींनी त्यांच्या त्यांच्या परिसरात केलेल्या पर्यावरणविषय प्रयत्नावर आधारित माहितीपट आणि लघुपट दाखविण्यात आले.  महोत्सवाचे दृक-श्राव्य संकलन तुषार सरोदे, समन्वय सुवर्णा भांबुरकर, निवेदन शताक्षी गावडे आणि ऑफिस व्यवस्थापन अर्जुन नाटेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading