डॉ अभिजीत मोरे यांची आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी नियुक्ती
पुणे:डॉ अभिजीत मोरे यांची आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी आज नियुक्ती करण्यात आली. आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सह प्रभारी गोपाल इटालिया व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके – पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे.
डॉ अभिजीत मोरे हे आरोग्य चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते असून एक दशकाहून अधिक काळ त्यांनी सातत्याने सरकारी व खाजगी आरोग्य सेवेतील अनेक समस्यांबाबत प्रबोधन, प्रशिक्षण, आंदोलन, लेखन अशा विविध माध्यमातून काम केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी राजकीय परिवर्तनासाठी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला.
डॉ अभिजीत मोरे वर्ष 2014 पासून आम आदमी पार्टीमध्ये कार्यरत असून या अगोदर त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये महाराष्ट्र राज्य प्रवक्ते, पुणे संघटन मंत्री या पदांवर काम केले आहे. डॉ अभिजीत मोरे हे आम आदमी पार्टीच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये सातत्याने कार्यरत असून पुणे शहरातील अनेक महत्त्वाच्या नागरी प्रश्नांवर, आरोग्य- शिक्षण- वीज- पाणी यासारख्या सार्वजनिक सेवांबाबत त्यांनी आवाज उठवला आहे. पुणे महानगरपालिकेतील अनेक घोटाळे त्यांनी उघडकीस आणले आहेत.
