Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राष्ट्रीयत्वाचे धोरण पुढे न्यावे : श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर


पुणे : सर्वसमावेशक हिंदुत्वाची कास धरून, राष्ट्रीयत्वाची प्रेरणा देण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला केवळ धार्मिकतेत न अडकवता त्यामागील त्यांची राजनिती, प्रशासकीय धोरणे समजून घेणे गरजेचे आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला जातीपातीच्या राजकारणात न अडकविता त्यांचे राष्ट्रीयत्वाचे धोरण अंगिकारत पुढे नेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचा स्थापना सोहळा आयोजित करण्यात आला होता.  त्या प्रसंगी श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार, भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत होते. स्पार्क फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर, पत्रकार हर्षद शेजाळ तसेच अध्यासनाचे संस्थापक ऋषिकेश सकनुर मंचावर होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वैचारिक मांडणी, त्याचा समाजावर होणारा प्रभाव समोर येणे आवश्यक आहे, असे सांगून होळकर पुढे म्हणाले, हिंदवी राष्ट्र हीच आपली ओळख आहे. हिंदुत्वाचा इतिहास विसरून चालणार नाही. जो देश आपली ओळख, मातृभाषा विसरतो तो देश कधीच प्रगती करू शकत नाही. संघर्षासाठी प्रयत्न करणे म्हणजेच क्रांती होय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली राष्ट्रीयत्वाची पेरणी पुढे नेण्यासाठी अनेक माता-भगिनींनी बलिदान दिले आहे. त्यात अहिल्यादेवी होळकर यांचे कार्यही मोलाचे आहे. पूर्वजांच्या ज्वलंत इतिहासातून प्रेरणा घेऊन आज आलेले नैराश्य, मळभ, नकारात्मकता नाहीशी होऊन सकारात्मकतेची उर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यसानासाठी ऋषिकेश सकनुर यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे होळकर यांनी कौतुक केले.
अध्यक्षपदावरून बोलताना प्रदीप रावत म्हणाले, अनेक महान पूर्वजांमुळे हजारो वर्षे हिंदुत्वाचा संघर्ष चालू आहे. त्यात अहिल्यादेवींचे स्थान महत्त्वाचे आहे. यामुळे हिंदू समाज अस्तित्व टिकवून आहे. देशभर विखुरलेला हिंदुत्वाचा राष्ट्रीय वारसा तंत्रज्ञानाच्या मदतीने एकत्रितपणे जतन करून समाजापुढे येणे आवश्यक आहे. अहिल्यादेवी अतिशय सतर्क होत्या. त्यांनी इंग्रजी राजवटीचे संकट वेळीच ओळखले होते. भविष्यातील धोक्याची जाणीव त्यांना झाली होती. त्यामुळेच स्वत:चे दु:ख विसरून त्यांनी राष्ट्रीयत्वाचे काम हाती घेतले. त्यामुळेच त्या संपूर्ण हिंदू समाजासाठी पुण्यश्लोक म्हणून आदर्श आहेत.
महेश पोहनेरकर म्हणाले, इतिहासातील अनेक घटना, संकल्पना चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडल्या गेल्या आहेत. त्यांना छेद देऊन सत्य समाजापुढे यावे म्हणून या अध्यासन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या अध्यासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले लोकप्रबोधनाचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.
हर्षद शेजाळ म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या कार्यामध्ये फक्त धार्मिकताच नाही तर राष्ट्रीत्वाची बांधणी ही प्रक्रिया प्रकर्षाने जाणवते. लोकशाहीची मूल्ये रुजवित अहिल्यादेवी यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. पारंपरिक पिढीजात मूल्यांना समाजासमोर आणणे गरजेचे आहे. इतिहासंदर्भातील मौखिक साहित्याची जपणूक व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अध्यासन स्थापनेचा उद्देश विशद करताना ऋषिकेश सकनुर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली समाजसेवा, त्यांचे कर्तृत्व, अखंड हिंदुस्थानासाठी त्यांनी केलेले कार्य या विषयीच्या माहितीतून प्रेरणा घेऊन विधायक व विवेकपूर्ण कार्य करावे यासाठी अध्यासनाची स्थापना करण्यात आली आहे. अध्यासनाद्वारे चर्चासत्र, परिसंवाद, लेखन-प्रकाशन, संशोधन करून युवा पिढीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणे हा प्रमुख उद्देश आहे.
सुरुवातीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत ऋषिकेश सकनुर, गजानन आंबोरे, नागसेन पुंडगे, गणेश सोलट यांनी केले. परिचय केदार गाडगीळ, सूत्रसंचालन अनिकेत भुसनर यांनी तर आभार प्रणव पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading