स्त्रीकडे विषमतेने पाहणारा समाज सुसंस्कृत नव्हे दांभिक : गीताली वि. मं.
पुणे : स्त्रीचे चारित्र्य आजही लैंगिकता आणि शरीराभोवती गुंडाळून ठेवले असल्याने स्त्रीकडे विषमतेने पाहणारा समाज आजही सुसंस्कृत आणि प्रगल्भ झालेला नाही तर तो दांभिक आहे हेच आजचे वास्तव आहे, असे परखड प्रतिपादन सुप्रसिद्ध स्त्री अभ्यासक आणि ‘मिळून साऱ्याजणी’च्या संपादक गीताली वि. मं. यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सुप्रसिद्ध स्त्री अभ्यासक आणि मिळून साऱ्याजणीच्या संपादक गीताली वि. मं. यांचे ‘आमच्या शरीरावर आमचा अधिकार’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष राजीव बर्वे, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते.
गीताली वि. मं. म्हणाल्या, स्त्री देहाभोवती शुचिता गुंडाळल्याने स्त्रीच्या आचार आणि विचारावर बंधने आली. स्त्री ही आधी माणूस आहे हेच लक्षात घेतले जात नाही आणि पितृसत्ताक पद्धत टिकवण्यासाठी तिच्यावर बंधने टाकून तिचे स्वातंत्र्य रोखले जाते. त्यामुळे जन्मापासून मरणापर्यंत तिच्याकडे अधिकारच नाही आणि आजही तो मागावा लागतो हीच खेदाची बाब आहे. स्त्री पुरुष भिन्नतेला विषमतेकडे नेण्याचे काम पितृसत्ताक पद्धतीने केले आहे. मला लैंगिक सुख हवे, माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे हे सांगण्याचे स्वातंत्र्य आज स्त्रीला आहे का हा कळीचा मुद्दा आहे. योनीशूचितेविषयी बोलणारे पुरुष लिंगशुचितेविषयी बोलतच नाहीत हे वास्तव आहे. तेव्हा समाजात स्वातंत्र्य समता असणे गरजेचे आहे.
त्या पुढे म्हणाल्या, पुरुष कसे बदलतील हे आजवर कुणी सांगितलेच नाही. ते आज सांगण्याची गरज असून पुरुषांना ‘बदला आता’ हे सांगायची वेळ आलेली आहे. आपण आता आधी माणूस व्हायला हवे हे पुरुषांनी लक्षात घ्यायला हवे. तेव्हाच एकमेकांचे भावविश्व समजून घेता येईल.
डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, आजच्या संस्कृतीचे वेगाने बाजारीकरण होते आहे. आपल्याकडे आजकाल कुठल्याही गोष्टीचा चटकन इव्हेंट केला जात असल्याने त्याचा मुख्य हेतू बाजूला पडतो आहे.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा जोशी म्हणाले, दुर्लक्षित करण्याचे राजकारण स्त्रियांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहे. आज काळाची खूप पावले पुढे पडली असली तरी स्त्रियांचे प्रश्न संपलेले नाहीत. ते वेगळ्या रूपात समोर येत आहेत. राजकारणात स्त्रियांच्या हाती सत्तेचे स्टिअरिंग असले तरी विकासाची गाडी कोणत्या दिशेला न्यायची याचे निर्णय घेणारे वेगळेच आहेत. साहित्य आणि नाटयसंमेलनाचे अध्यक्षपद महिलांनी भूषविले पण पुरोगामित्वाचा आव आणणाऱ्या महाराष्ट्रात एकाही राजकीय पक्षाने मुख्यमंत्रीपद अथवा उप मुख्यमंत्रीपद एकाही महिलेला आजवर दिलेले नाही. यावरूनच राजकीय प्रगल्भतेचा अभाव दिसतो. अजूनही व्यापक समाज शिक्षणाची आवश्यकता आहे.
चिन्मयी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी केले. वि.दा.पिंगळे यांनी आभार मानले.
स्त्रीला देवळातून बाहेर काढले…
विटाळकी आणि इतर बंधने टाकून स्त्रीला अगदी पद्धतशिरपणे देवळातून बाहेर काढले आहे असे गीताली वि. मं. म्हणाल्या, धर्माचा मानवता हा आत्मा हरवला असून त्याचे नको ते स्वरूप आपण स्वीकारले आहे. धर्माची संस्था झाली की तिथे सत्ताकारण सुरू होते. सत्यशोधन ही धर्माची पूर्वअट असताना आज नेमके तिकडेच दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे जे जे चांगले आहे ते तेच घ्यावे ही परिवर्तनवादी आणि पुरोगामी भूमिकाच महत्त्वाची ठरते.
