Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

सतारीच्या झंकाराने नादमुद्रा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात

विदुषी डॉ अश्विनी भिडे देशपांडे यांच्या भावपूर्ण गायनाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिक भारावले

पुणे : अभिजात भारतीय संगीताचा प्रचार, प्रसार व्हावा, रसिक श्रोत्यांना एकाहून एक सरस कलाकारांची कला अनुभविता यावी, या उद्देशाने अल्फा इव्हेंटस् च्या वतीने आणि बेलवलकर हाऊसिंग यांच्या सहकार्याने आयोजित नादमुद्रा महोत्सवाचा दुसरा दिवस आज संपन्न झाला.

कर्वेनगर येथील डी पी रस्त्यावरील केशवबाग येथे हा तीन दिवसीय सांगीतिक महोत्सव सुरु असून महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे. कार्यक्रमाचे आयोजक निखिल जोशी, सुप्रसिद्ध गायिका अपर्णा पणशीकर, विदुषी मीरा पणशीकर, संपदा बेलवलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंडित विजय कोपरकर, पंडित रघुनंदन पणशीकर यांनी देखील आज महोत्सवाला हजेरी लावली.

भेंडी बझार घराण्यातील तरुण सतारवादक, उस्ताद मोहसीन अली खान यांचे सुपुत्र व शिष्य असलेल्या मेहताब अली नियाझी यांच्या सतारवादनाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली.

यावेळी बोलताना मेहताब अली नियाझी म्हणाले, “व्यक्तिशः पुणे शहराला कायमच माझ्या मनात एक विशेष जागा राहिली आहे. पुणे शहराचे भेंडी बाजार घराण्याशी खास नाते आहे असे मी मानतो. येथे आल्यावर आमच्या घराण्याचे संस्थापक असलेले उस्ताद अमन अली खान यांची कायमच आठवण येते.”

मेहताब अली नियाझी यांनी राग झिंझोटी सादर करीत आपल्या वादनाचा सुरुवात केली. उस्ताद विलायत खान यांच्या गायकी अंगाचे दर्शन यानिमित्ताने उपस्थित रसिक प्रेक्षकांना झाले. यावेळी मेहताब यांनी आलाप, विलंबित रूपक ताल, मध्यलय झपतालातील बंदिश, मध्यलय व द्रुतलय तीनताल यांचे प्रभावी सादरीकरण केले. आपल्या घराण्याचा पारंपरिक मेरूखंड प्रस्तुत करीत त्यांनी रसिकांची मने जिंकली. उस्ताद रईस खान यांची ‘अनार -अनार’ ही अफगाणी धून सादर करीत त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. मेहताब यांना रामदास पळसुले व गणेश तानवडे यांनी समर्पक तबलासाथ केली.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या सुमधुर गायनाने झाला. त्यांनी राग मारुबिहागने आपल्या गायनाला सुरुवात केली. भावपूर्ण, सौंदर्यपूर्ण आणि कलापूर्ण सादरीकरणाने त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांनी विलंबित तीनतालातील ‘रसिया हो ना जावो…’ आणि मध्यलय तीनतालातील ‘दरपत रैन दीन..’ या पारंपरिक बंदिशी प्रस्तुत केल्या. पूर्वी थाटाचा राग मालवी सादर करीत त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना यावेळी भरत कामत यांनी तबल्यावर, सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीवर तर ऋतुजा लाड व श्रुती अभ्यंकर यांनी तानपुऱ्यावर साथसंगत केली. आरती पटवर्धन यांनी आजच्या दुसऱ्या दिवसाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading