Loksabha Election : महायुतीच्या जागा घटणार ?
मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी कोण किती जागा जिंकणार, याची उत्सुकता वाढली आहे. त्यातच समोर आलेल्या इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या ओपिनियन पोलने भाजपचे टेन्शन वाढवले आहे. भाजपने महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे, पण पोलच्या अंदाजानुसार महायुतीला झटका बसताना दिसत आहे. भाजप सर्वाधिक जागा जिंकेल, मात्र महायुतीच्या जागा घटणार असा कौल या पोलमधून समोर आला आहे.
इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या ओपिनियन पोल चे महाराष्ट्रातील आकडे समोर आले आहेत. या ओपिनियन पोलनुसार भाजप महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकू शकते. मात्र, महायुतीत असलेल्या शिवसेना (६ जागा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (४ जागा) मिळून १० जागा मिळेल, असा अंदाज पोलच्या निष्कर्षाआधारे मांडण्यात आला आहे.
भाजप प्रणित महायुतीने ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे, पण त्यांचे हे स्वप्न भंग पावेल, असा अंदाज या ओपिनियन पोलची आकडेवारी सांगते. भाजप २५, शिवसेना ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ४ अशा एकूण ३५ जागाचे महायुतीला जिंकता येईल, असा या पोलचा अंदाज आहे. २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला ४१ जागा मिळाल्या होत्या. त्याच्याशी तुलना केली असता महाराष्ट्रात युतीला ६ जागांचा फटका बसताना दिसत आहे.
महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवणारा आहे. ४८ पैकी केवळ १३ जागाच महाविकास आघाडीला मिळतील, असे या पोलचे निष्कर्ष आहेत. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वाधिक जागा जिंकू शकते असा अंदाज आहे. ठाकरेंच्या शिवसेना ८ जागा जिंकू शकते, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ३ जागा आणि काँग्रेसला २ जागांवरच विजय मिळेल, असे अंदाज या ओपिनियन पोलचे आहेत.
या पोलने महाविकास आघाडीबरोबरच महायुतीचीही झोप उडवली आहे. महाविकास आघाडीकडून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्व राजकीय तडजोडी आणि आघाड्या करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे महायुतीकडून ४५ पेक्षा जास्त आणि कमीत ४१ जागा जिंकण्याचे प्रयत्न आहेत. पण, या पोलनुसार महायुतीला ६ जागांनी फटका बसताना दिसत आहे. हे ओपिनियन पोल आहेत. त्यामुळे निकालानंतरच महायुती आणि महाविकास आघाडीची खरी ताकद दिसणार आहे.
