Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

भारतीय उद्योजकांनी जागतिक नेतृत्व केले पाहिजे – डॉ. रघुनाथ माशेलकर

पुणे : उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ परदेशी कंपन्याचे तंत्रज्ञानाची नक्कल करण्यापेक्षा आपल्या देशातील जनतेला काय गरज आहे हे लक्षात घेवून सर्व सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून संशोधन होणे गरजेचे आहे. स्वबळावर तंत्रज्ञान निर्माण करून भारतीय उद्योजकांनी जागतिक नेतृत्व केले पाहिजे अशी अपेक्षा पद्मविभूषण जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी एम. आय.जी. स्मार्टटेक परिषदेत केली.  

       पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते एम. आय. जी स्मार्टटेक परिषदेचे उद्घाटन करण्यात आले तर ‘स्टुडंट्स इनोव्हेशन पार्क’ चे उद्घाटन नितीन न्याती यांनी केले. या प्रसंगी डॉ. गणेश नटराजन, केंद्र सरकारच्या नॅशनल प्रोग्राम डायरेक्टर – इज ऑफ डुइंग बिझनेसचे अभिजित सिन्हा,  एम. आय. जीचे अध्यक्ष मनोज बेहेडे, रमा किर्लोस्कर, ऋषी बागला, आनंद देशपांडे, सुधीर मेहता,  रमन नंदा, बजरंग लोहिया आदी मान्यवर उपस्थित होते.

        माशेलकर म्हणाले कि, सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात उद्योग क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. विशेषतः तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्यांचे जीवन कशा प्रकारे सुलभ करता येईल.  देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वसामान्यांचा विकास होणे हि तितकेच गरजेचे आहे. आजच्या या जगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून विकास अधिक जलद गतीने होऊ शकतो. जागतिक उद्योग क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी जागतिक दर्जाचे उत्पादन व्यवस्थापन असणे गरजेचे आहे.भारतीय उद्योजकांनी जागतिक नेतृत्व केले पाहिजे.

           मनोज बेहेडे म्हणाले, उद्योग क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी उद्योजकांनी एकत्र येऊन संघटित होणे गरजेचे आहे. देशाच्या विकासामध्ये उद्योग क्षेत्राचे मोठे योगदान आहे. त्यातही लघु आणि मध्यम उद्योजकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. या लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना पाठबळ आणि व्यासपीठ देणे हा या एम. आय. जी स्मार्टटेकच्या परिषदेचा मुख्य हेतू आहे.

          न्याती म्हणाले ऑनलाइन व्यासपीठाप्रमाणेच उद्योजकांना एकत्रित करण्यासाठी प्रत्यक्ष व्यासपीठाची गरज होती. या उद्देशानेच एम. आय. जी स्मार्टटेक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या समाजहिताच्या उपक्रमाला पाठिंबा देऊन आम्हाला निश्चितच आनंद झाला.

      गणेश नटराजन म्हणाले उद्योग क्षेत्रामध्ये संवाद असणे गरजेचे आहे. कोणताही उद्योजक एकट्याच्या बळावर मोठा होऊ शकत नाही. त्यासाठी उद्योजकांची साखळी निर्माण होणे गरजेचे आहे. ही गरज या परिषदेच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. आजच्या युगामध्ये तंत्रज्ञानाचा उद्योग क्षेत्रामध्ये अधिक अवलंब केला तर उद्योग अधिक पटीने वाढू शकते. देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वांनीच हातभार लावणे गरजेचे असून त्यामध्ये उद्योग क्षेत्राने पुढाकार घेतला पाहिजे.

अभिजीत सिन्हा म्हणाले विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी उद्योग क्षेत्रासह सर्व क्षेत्रांचे योगदान गरजेचे आहे. शासकीय स्तरावर उद्योग क्षेत्राला पाठिंबा देणे आणि त्यांच्यासाठी सुलभ वातावरण निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे उद्योजकांना त्यांचा उद्योग सुरू करण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी चांगले वातावरण निर्माण होऊ शकेल. उद्योजकांचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने भारताचा सर्वांगीण विकास होऊ शकेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading