Friday, April 24, 2026
Latest NewsPUNE

जगासाठी भारत आशेचा व प्रेरणेचा किरण – केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर 

पुणे  : २०१४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही जगाच्या नकाशावर एक ‘फ्रॅजाईल’ अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात होती. कोविड टाळेबंदीदरम्यान संपूर्ण जग थांबले होते. त्यानंतर जागतिक पातळीवर इतर देशांची झालेली अवस्था आपल्या सर्वांनाच माहीत असताना आज भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेला वेग हा उल्लेखनीय आहे. आज भारत देश जगासाठी आशेचा आणि प्रेरणेचा प्रतीक असल्याचे प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकता केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केले. विकसित भारत अॅम्बसिडर मीटअपचा कार्यक्रम आज सेनापती बापट रस्त्यावरील एमसीसीआयएच्या सुमंत मूळगांवकर सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी चंद्रशेखर बोलत होते.

भाजपचे नेते ॲड हितेश जैन, विकसित भारत पुणे समन्वयक आदित्य पिट्टी, विकसित भारत उपक्रमाच्या राष्ट्रीय समन्वयक कृत्तिका भंडारी, विकसित भारत पुणे समूहाचे सदस्य प्रवीण जैन, विकसित भारत संस्थेचे इतर सभासद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजीव चंद्रशेखर म्हणाले, “२०१४ पर्यंत देशात राजकीय घराणेशाही, भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई, अपुऱ्या पायाभूत सोयीसुविधा, बेशिस्त प्रशासन या गोष्टी होत्या. आज १० वर्षांनंतर भारत जागतिक महासत्तेच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. नजीकच्या २ ते ३ वर्षांत आपण जर्मनी आणि जपान या देशांना मागे टाकत जगातील अमेरिका, चीन या देशांसोबत पहिल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये गणले जाऊ.”

आज देशात १३ लाख कोटी रुपयांचे पायाभूत सोयी सुविधा असलेले प्रकल्प उभे राहत आहेत. संरक्षक दृष्ट्या आवश्यक उत्पादनांच्या क्षेत्रात देश स्वयंपूर्ण होत आहे. आज देशात १,२०,००० हून अधिक स्टार्ट अप उभे राहत आहेत, राजकीय क्षेत्र असो अथवा इतर कोणतेही क्षेत्र घराणेशाही शिवाय कोणालाही काम करणे सहज शक्य आहे, हे मागील १० वर्षांच्या सुशासनाचे परिणाम आहेत असे चंद्रशेखर म्हणाले.

भारताने तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकशाही बळकट केली आणि विकसित भारत बनविण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे असे सांगत राजीव चंद्रशेखर पुढे म्हणाले की, “आज भारत हा देश सर्वात जास्त डिजिटली कनेक्टेड देशांपैकी सर्वांत वरच्या स्थानावर आहे. आज देशाच्या दुर्गम भागातील नागरिक देखील डिजिटली जोडले गेले आहेत. ते सर्व जण डिजिटल पेमेंट, आधार लिंकिंगच्या द्वारे सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत ही क्रांतीकारी बाब आहे.”

जागतिक पटलावर आज भारत हा जिवंतपणा आणि गतिशील देशाचे प्रमुख उदाहरण आहे. भारताने स्वतःचा मार्ग तयार केला आहे. जग त्याचे अनुसरण करेल असा विश्वास चंद्रशेखर यांनी व्यक्त केला.
भारतीय असणे ही आज अविश्वसनीय गोष्ट झाली असून आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान आपल्याला वाटू लागला आहे. बळकट अर्थव्यवस्थेसाठी बळकट नेतृत्वाची गरज आहे. आज आपल्याकडे ते नेतृत्व असून बळकट नेतृत्व हेच भारताला विकसित भारत बनवू शकते असेही चंद्रशेखर म्हणाले.

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासनात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक असे बदल केलेच. यामध्ये त्यांनी केलेला तंत्रज्ञानाचा वापर वाखाणण्याजोगा आहे, असेही त्यांनी सांगितले.

काही वर्ष आधी ‘टेक्नॉलॉजी कनझ्युमर’ असलेला आपला देश आता स्वावलंबनाद्वारे ‘टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर’ पर्यंत प्रवास करीत आहे. २०१९ साला पर्यंत भारताच्या ग्रामीण भागात ३.६ कोटी  घरांमध्ये नळाने पिण्याचे पाणी येत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३.५ लाख कोटी रुपयांची तरतूद करून २०२३ पर्यंत ११.५ कोटी घरांमध्ये नळाने पिण्याचे पाणी पोहचविण्याची सोय केली आहे अशी माहिती चंद्रशेखर यांनी दिली.

विकसित भारताच्या दिशेने पाऊले टाकत असताना मागील १० वर्षांत २५ कोटी नागरिक हे दारिद्र्यरेषेच्या वर आणि गरिबीतून बाहेर आले आहेत. असे सांगत ते पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षांत ३० कोटी नागरिकांना कौशल्यावर आधारित शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. सध्याच्या नव्या राष्ट्रीय धोरणात देखील कौशल्यावर आधारित व्यवसायांना महत्त्व दिल्या गेले आहे. २०१४ पर्यंत देशात कौशल्याधारीत नागरिकांची संख्या जास्त नव्हती आज ही परिस्थिती बदलली असून कौशल्याधारित नागरिकांच्या संख्येत देखील वाढ होत आहे.” कौशल्याधारीत महिला कामगारांची संख्या देखील वाढत आहे याकडे चंद्रशेखर यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading