संतूरवादन आणि कथक नृत्याने गानसरस्वती महोत्सवाच्या चौथ्या सत्राला सुरुवात
पुणे : संतूरवर छेडलेले राग हंसध्वनीचे सूर आणि कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांच्या मनोहर कथकनृत्य प्रस्तुतीने आज गानसरस्वती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या चौथ्या सत्राला सुरुवात झाली.
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते.ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी दहावा गानसरस्वती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सुरु असलेल्या या महोत्सवाला आज नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र बिभास आमोणकर, निहार आमोणकर, धवल किर्लोस्कर, मृगा किर्लोस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात डॉ शंतनु गोखले यांच्या संतूरवादनाने झाली. यावेळी त्यांनी राग हंसध्वनी सादर करीत दमदार सादरीकरण केले. सुरुवातीला पारंपरिक आलाप, जोड, झाला यांची प्रस्तुती त्यांनी केली. यानंतर झपताल आणि तीन तालातील रचना सादर करीत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. डॉ शंतनु गोखले यांना पं रामदास पळसुले यांनी समर्थ तबलासाथ केली.
यानंतर पंडिता रोहिणी भाटे यांची शिष्या असलेल्या शर्वरी जमेनीस यांनी आपल्या कथकनृत्य प्रस्तुतीने उपस्थितांना खिळवून ठेवले. यावेळी जमेनीस म्हणाल्या, “काही महोत्सवांची नावे उच्चारताना आम्हा कलाकारांना आदरयुक्त भीती वाटते, गानसरस्वती महोत्सव हे त्यातलेच एक नाव आहे. या व्यासपीठाला साजेशी कलाकृती आपल्याकडून घडेल का याचा विचार कायम असतो.”
शर्वरी जमेनीस यांनी नृत्यवंदना सादर करीत आपल्या सादरीकरणाला सुरूवात केली. या प्रस्तुतीत नृत्यासाठी आवश्यक असलेल्या स्थळ, काळ, ऊर्जा, स्वर, लय, वाद्यवृंद, नुपूर आदी घटकांना आणि नृत्यगुरू नटराज यांना वंदना करण्यात आले. यासाठी डॉ चैतन्य कुंटे यांनी संगीत दिले असून स्वतः शर्वरी जमेनीस यांनी साहित्य रचना केली आहे.
यानंतर त्यांनी सोळा मात्रांच्या तीनतालचे बहारदार सादरीकरण केले. त्यांनी सादर केलेल्या आमद, परण आमद, तिहाई अशा नृत्यातील बारकाव्यांना उपस्थितांनी दाद दिली. यानंतर त्यांनी काली मातेचे वंदन करणारे काली परण सादर केले. सोळा मात्रांचा तीनताल सोळा चक्कर आणि पारंपरिक बंदिश यांचे सादरीकरण देखील त्यांनी केले.
सदर वर्ष हे पंडिता रोहिणी भाटे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने शर्वरी जमेनीस यांनी रोहिणी ताई यांनी रचलेले काही तुकडे उपस्थितांसमोर सादर केले. विठ्ठल रखुमाई वर आधारित जमेनीस यांनी स्वतः रचलेल्या मराठी कवितेला उपस्थितांनी मनसोक्त दाद दिली.
‘श्याम सुंदर राजसा…’ ही किशोरी आमोणकर यांची बंदिश त्यांनी अभिनय व शृंगार अंगाने सादर केली.
लक्ष्मी नारायण ठोसर या रामदास स्वामी यांच्या पत्नीवर रचलेली कविता शर्वरी जमेनीस यांनी आपल्या नृत्य शैलीत प्रस्तुत करीत लक्ष्मी नारायण ठोसर या नायिकेची व्यक्तीरेखा उलगडून दाखविली.
शर्वरी जमेनीस यांना निखिल फाटक (तबला), यशवंत थिट्टे (संवादिनी), विनय रामदासन (गायन), धवल जोशी (बासरी) आणि वैष्णवी देशपांडे (पढंत) यांनी साथसंगत केली. मिलींद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
