Maratha Reservation : सरकारने आमची फसवणूक केली; सलाईन काढून फेकले – मनोज जरांगे पाटील
जालना : आज राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले. यामध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देता स्वतंत्रपणे 10 टक्के आरक्षण देण्यात आले. जरांगे पाटलांच्या कुणबी मराठा आरक्षण मागणीला सरसकट बाजूला सारल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारने आपली फसवणूक केली असल्याचा आरोप केला आहे. तसेच सलाईन काढून टाकले असून उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांवर सहा महीने आम्ही विश्वास ठेवला. पण आज त्यांनी मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. पण आमची ती मागणीच नाही. आम्हाला ओबीसी मधून मराठा कुणबी म्हणून आरक्षण पाहिजे आहे. आज राज्य सरकारने आमची फसवणूक केली आहे. हे आरक्षण निवडणुकांपूरते लागू करण्यात आले आहे. मागच्या वेळी प्रमाणाचे हे आरक्षणदेखील न्यायालयात टिकले नाही तर बोंबलत बसायचं का? आम्हाला त्या फद्यांतच पडायचे नाही. प्रत्येकवेळी भावनेच्या आहारी जाऊन आमच्या लेकरांचं वाटोळं होऊ देणार नाही. आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला मिळाले पाहिजे. हरकतीचा विषय पुढे करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा हे बरोबर नाही.
उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार
राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक आज एकमताने मंजूर करून मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिले आहे. यावर जरांगे पाटील असहमत असून आता मराठा आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचे ठरवले आहे. यासाठी उद्या 12 वाजता अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे.
