Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

धार्मिक पुस्तकांची निर्मिती हे एक व्रत : डॉ. सदानंद मोरे


पुणे : महाराष्ट्राला अनोखी मुद्रण-प्रकाशन संस्कृती असून ती माहिती, ज्ञान, विद्यालय या पातळीवर उत्तम पद्धतीने विकसित झाली आहे. महाराष्ट्रामधील धार्मिक पुस्तकांची निर्मिती करणाऱ्या मुद्रक-प्रकाशन संस्थांनी सामान्य जनतेचे आध्यात्मिक व धार्मिक भरणपोषण करण्यास हातभार लावला आहे. धार्मिक साहित्याची निर्मिती करणे हे एक व्रत आहे आणि ते प्रकाशकांनी उत्तम रितीने सांभाळले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

धार्मिक ग्रंथ प्रकाशित करण्याची परंपरा लाभलेल्या सारथी प्रकाशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या आनंद सोहळ्यात डॉ. मोरे अध्यक्षपदावरून बोलत होते. बिबवेवाडीतील संगम हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सारथी प्रकाशनचे संचालक मिलिंद जोरी यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, ज्येष्ठ प्रकाशक अनिल कुलकर्णी, रमेश कुंदुर मंचावर होते. संत श्रीपाददास सुभाष शिंदे लिखित ‌‘सार्थ चांददेव पासष्टी’ या पुस्तकाचे या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
डॉ. मोरे पुढे म्हणाले, सारथी ही नामवंत प्रकाशन संस्था सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे हा सोहळा अतिशय हृद्य आहे. देश पारतंत्र्यात असताना ब्रिटीशांनी त्यांच्या धर्म प्रसाराकरीता छापिल पुस्तकांचा वापर करण्यास सुरुवात केली. आपल्याही धर्माचा प्रचार व प्रसार छापिल पुस्तकांच्या माध्यमातून होऊ शकेल या जाणीवेने उपक्रमशील व्यक्तींनी हा वसा हाती घेत मुद्रण आणि प्रकाशनाच्या माध्यमातून आपल्याकडील धार्मिक व सांस्कृतिक ठेवा जनसमान्यांपर्यंत पोहाचविला. तंत्रज्ञान विकसित नसताना देखील धार्मिक पुस्तकांच्या छपाईचे कार्य अविरतपणे सुरू ठेवून या इतिहासातून प्रेरणा घेत आजही धार्मिक साहित्यनिर्मिती होत आहे याचा त्यांनी गौरव केला.
रामभाऊ जोरी यांच्या सारथी प्रकाशनाच्या कार्यात आपलेपणा जपला गेला, असे सांगून आठवणींना उजाळा देत डॉ. न. म. जोशी यांनी ‌‘सारथी’च्या कार्यालयात येणाऱ्या दिग्गज व्यक्ती, कलावंत यांच्या समवेतचे काही किस्से सांगितले. कार्यक्रमांमधून संतवाणी सादर करतो पण सारथी प्रकाशनच्या इंदिरा प्रेसमध्ये आल्यानंतर संत-महात्म्यांच्या प्रत्यक्ष स्पर्शाची अनुभूती येते असे उद्गार भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी काढल्याची आठवण त्यांनी सांगितली.
रमेश कुंदुर म्हणाले, प्रकाशन व्यवसायातच असल्याने मला रामभाऊ जोरी यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आजच्या पिढीतही आमच्यात वैचारित देवाणघेवाण होत असते आणि त्यातूनच कौटुंबिक जिव्हाळा जपला जातो.
रामभाऊ जोरी यांनी काळानुरूप प्रकाशन व्यवसायात केलेले बदल, त्यासाठी वापरलेले कौशल्य याविषयीच्या आठवणी सांगत अनिल कुलकर्णी यांनी जोरी परिवाराशी असलेले स्नेहबंध उलगडले.
सारथी प्रकाशनच्या वाटचालीत मदतीचा हात देणाऱ्या व्यक्तींचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वागत आणि आभार प्रदर्शन मिलिंद जोरी यांनी केले. सूत्रसंचालन शमा गद्रे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading