Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण जाहीर

मुंबई : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे. 

अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांनी मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयातुन प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांना बालपणापासूनच नाटकांची आवड जडली होती. वयाच्या अठराव्या वर्षी अशोक सराफ शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी ’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतून देखील त्यांनी भूमिका केल्या. गजानन जागीरदार यांच्या ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’मधील इरसाल पोलीस, ‘राम राम गंगाराम’मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी साकारल्या. त्यानंतर अशोक मामांची कारकीर्द सर्वांनाच माहित आहे.

या अभिनेत्यानं आपल्या सहजसुंदर अभिनयानं मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. नाटक, सिनेमामधून अशोक सराफ प्रेक्षकांच्या भेटीला आले. आजही ते चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. आजही मराठी प्रेक्षकांना त्यांना पडद्यावर पाहताना मनापासून आनंद होतो. अशाच अष्टपैलू अभिनेत्याचा आता महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading