उत्तरप्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, गोवा संघांची विजयी कामगिरी !!
पुणे, २४ जानेवारीः महाराष्ट्रीय मंडळ, ब्लाईंड क्रिकेट संघटना आणि पुणे पुरूष ब्लाईंड संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ब्लाईंड क्रिकेट स्पर्धेत उत्तरप्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल आणि गोवा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.
मुकूंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ आणि डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पारस भाटीया याच्या नाबाद ९० धावांच्या जोरावर उत्तरप्रदेश संघाने मध्यप्रदेश संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मध्यप्रदेश संघाने १३० धावांचे लक्ष्य उभे केले. हे लक्ष्य उत्तरप्रदेश संघाने ९.३ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केले. पारस भाटीया याने ४८ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने ९० धावा करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
हरींदर सिंग याच्या नाबाद ७१ धावांच्या जोरावर पंजाब संघाने दिल्ली संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली संघाने १०८ धावा धावफलकावर लावल्या. पंजाब संघाच्या हरींदर याने २६ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने ७१ धावा करून संघाला सहज विजय मिळवून दिला. कमी धावसंख्येच्या झालेल्या सामन्यात अरींदर मोंडल याच्या कामगिरीच्या जोरावर पश्चिम बंगाल संघाने दिल्लीचा १० गडी राखून सहज पराभव केला. पश्चिम बंगाल संघाचा हा सलग तिसरा विजय ठरला. जिग्नेश पानीया याच्या १२३ धावांच्या खेळीच्या जोरावर गोवा संघाने मध्यप्रदेश संघाचा १४३ धावांनी सहज पराभव केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
मध्यप्रदेशः २० षटकात ७ गडी बाद १३० धावा (मुकेश राठोर ५९ (५८, ६ चौकार), कपिल यादव १८, पारस भाटीया ३-२३, कमल शर्मा २-२२) पराभूत वि. उत्तरप्रदेशः ९.३ षटकात १ गडी बाद १३१ धावा (पारस भाटीया ९० (४८, १५ चौकार), आदर्श पी. १६); सामनावीरः पारस भाटीया;
दिल्लीः २० षटकात १० गडी बाद १०८ धावा (रेहान पी. २७, राजीव राजन १२, बलजिंदर सिंग ३-२३, अमित के. २-६) पराभूत वि. पंजाबः ८.२ षटकात २ गडी बाद १११ धावा (हरींदर सिंग नाबाद ७१ (२६, १५ चौकार), गौरव सिंग २६); सामनावीरः हरींदर सिंग;
दिल्लीः १५.२ षटकात १० गडी बाद ५७ धावा (राम बारोसा १२, इरफान हेमराम २-५, राजु हलदर १-२) पराभूत वि. पश्चिम बंगालः ३ षटकात बिनबाद ६१ धावा (अरींदम मोंडल नाबाद ३७, राहूल सोरेन नाबाद १७); सामनावीरः अरींदम मोंडल;
गोवाः २० षटकात ३ गडी बाद २५८ धावा (जिग्नेश पानिया १२३ (६२, १७ चौकार), आफताब पटेल ६८ (३७, ६ चौकार), निलेश एम. ३०) वि.वि. मध्यप्रदेशः २० षटकात ८ गडी बाद ११५ धावा (अमित कुमार ५१ (३१, १० चौकार), राधेेशाम पी. १०, विकास बनसोडे २-३२); सामनावीरः जिग्नेश पानीया;
