Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या जाण्याने संगीत सृष्टीला मोठा धक्का …..

पुणे : स्वरयोगिनी, पद्मविभूषण, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे पुण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. आज त्या मुंबईत ‘स्वरप्रभा’ या कार्यक्रमासाठी जाणार होतया, मात्र त्या आधीच त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संगीत सृष्टीला मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 पोरके झालो … 

“किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ प्रभा अत्रे यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. अगदी काही काळापूर्वीच त्यांची भेट झाली होती त्यावेळी त्या अगदी छान होत्या. माझ्या आईच्या गुरुभगिनी असल्याने त्या माझ्या सांगीतिक मावशी होत्या. सुरेशबाबू माने यांच्याकडे त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले होते. लहानपणापासून त्यांनी मला पाहिलेले आहे, आमच्यात चांगला घरोबा होता. त्यांच्या गायनात किराणा घराण्याची वैशिष्ट्ये होतीच मात्र त्या उत्तम रचनाकार देखील होत्या. गेले कित्येक वर्ष सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचे गायन होत असे, आमच्यावर त्यांचा कायमच आशीर्वाद होता. त्यामुळे एक पोरकेपणा जाणवतोय. त्यांना विनम्र श्रद्धांजली.”

– श्रीनिवास जोशी (कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ)

————————————————————————————————————————————-

आता त्यांना लाईव्ह ऐकता येणार नाही

“ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे जाणे ही एक अतिशय दु:खद घटना आहे. त्यांनी अनेक वर्षे सातत्याने संगीताची सेवा केली. माझी आजी- आजोबांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला डॉ. प्रभा अत्रे यांचे गाणे झाले होते अशी आठवण मला आजीने सांगितली होती. त्यांचे अनेक रेकॉर्डिंग, गाणी मी ऐकली आहे. त्यांचे गाणे हे शुद्ध, स्वच्छ, निर्मळ, सुंदर सूर असलेले आणि रेखीव असे होते. आता ते लाईव्ह ऐकता येणार नाही हे दु:ख आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांना मी आदरांजली वाहतो.”

राहुल देशपांडे (राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक)

—————————————————————————————————————————————–

संगीत क्षेत्रात कधी न भरून न येणारी पोकळी निर्माण झालीये

“पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे असे आपल्यातून निघून जाणे ही आतिशय दु:खद घटना आहे. आमच्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका तर त्या होत्याच शिवाय त्या अतिशय प्रगल्भ विचारांच्या गायिका होत्या, असे मला वाटते. त्यांनी किराणा घराण्याचे गाणे समृद्ध केलेच याबरोबरच इतर गायकांची गाणी ऐकून ती आपल्या गायकीमध्ये समाविष्ट करून त्यांनी आपली वेगळी शैलीही निर्माण केली होती. त्या अतिशय विचारवंत अशा गायिका होत्या. त्या ‘ग्रेट परफॉर्मर’ होत्याच पण त्यांचे संगीत क्षेत्रातील संशोधन देखील महत्त्वाचे होते. त्यांनी ते पुस्तकरुपातही रसिकांसमोर मांडले होते. गाण्यातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व, उत्कृष्ट परफॉर्मर, संशोधक आणि प्रयोगशील गायिका म्हणून त्या लक्षात राहतील. त्या आम्हाला कायमच एका दीपस्तंभासारख्या होत्या. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात खूप मोठी भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

-आनंद भाटे (शास्त्रीय गायक)

————————————————————————————————————————————-

त्यांचे गाणे आणि बोलणे दोन्ही सुरेलच

“ज्यांनी ज्यांनी संगीत क्षेत्रावर आपली छाप पाडली त्यांपैकी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे नाव महत्त्वाचे होते. त्यांचे गायन आलापी प्रधान आणि सर्वांगसुंदर होते. संगीत क्षेत्रात त्यांनी आपली वेगळीच शैली निर्माण केली होती, त्यांचा आवाज हा वेगळाच होता म्हणून त्यांच्या गायनाची छाप अनेकांवर पडली. डॉ प्रभा ताई यांचे गाणे मी खूप ऐकायचे असे मला मला गुरु किशोरीताई अमोणकर देखील सांगायच्या. माझी पिढी, माझ्या आधीची पिढी आणि  नंतरची पिढी अशा तीनही पिढ्यांवर डॉ प्रभा अत्रे यांच्या गाण्याची छाप आहे. त्यांचे गाणे आणि बोलणे दोन्ही सुरेलच होते. ‘स्वरमयी’ हे त्यांचे पुस्तक वाचतांना त्या किती ‘म्युझिकल’ आहेत हे कळते. ते वाचताना आपण त्यांची मैफल अनुभवतोय असे वाटते. पणशीकर कुटुंबीय, आमोणकर कुटुंबीय आणि नाट्यसंपदा प्रतिष्ठान आम्हा सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.”

– पं रघुनंदन पणशीकर (शास्त्रीय गायक व कार्याध्यक्ष, नाट्यसंपदा प्रतिष्ठान)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading