शाहिरी दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन
पुणे: स्व. शाहीर महर्षी आत्माराम पाटील जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने ‘शाहिरी दिनदर्शिका २०२४’ चे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात शाहीरमहर्षी आत्माराम पाटील यांचे मोठे योगदान होते. महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत विपुल शाहिरी लेखन करणारे शाहीर म्हणून शाहीरमहर्षी आत्माराम पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाहिरी दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन करण्यात आल्याची माहिती यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या कार्याविषयीची माहिती तसेच दिवंगत ज्येष्ठ शाहिरांचे जन्मदिन या दिनदर्शिकेत देण्यात आले आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. यावेळी प्रा. संगीता मावळे उपस्थित होत्या.
