40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत जपानच्या मोयुका उचिजिमाला विजेतेपद
नवी मुंबई : नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयटीएफ, एआयटीए यांच्या मान्यतेखाली आणि गणेश नाईक यांच्या पुढाकाराने होत असलेल्या 40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत जपानच्या मोयुका उचिजिमाने विजेतेपद संपादन केले.
वाशी येथील गणेश नाईक टेनिस कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित जपानच्या मोयुका उचिजिमाने रशियाच्या अव्वल मानांकित एकतेरिना मकारोवाचा 6-4, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 19मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला तोडीस तोड खेळ केला व त्यामुळे 4-4 अशी बरोबरी निर्माण झाली. नवव्या गेममध्ये मोयुकाने एकतेरिनाची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये मोयुकाने एकतेरिनाची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस भेदली. या सेटमध्ये मोयुकाने आपले वर्चस्व कायम राखत हा सेट 6-1असा जिंकुन विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेतील एकेरी गटातील विजेत्या खेळाडूला 70 डब्लूटीए गुण व 6,094डॉलर(2,45,000/-रुपये) , उपविजेत्या खेळाडूला 42डब्लूटीए गुण व 3,257डॉलर(1,30,600/- रुपये) अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एनएमएसएचे अध्यक्ष आमदार गणेश नाईक, इस्त्राईलचे कन्सल्टंट जनरल कोब्बी शोशानी, स्पर्धा संचालक व एनएमएसएचे उपाध्यक्ष डॉ.दिलीप राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: एकेरी:
मोयुका उचिजिमा(जपान)[2]वि.वि. एकतेरिना मकारोवा(रशिया)[1] 6-4, 6-1.
