Monday, August 31, 2026
Latest NewsSports

सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया संघाला विजेतेपद !!

पुणे : नेशन वाईड लॉयर्स क्रिकेट संघटना आणि पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २६ व्या वकीलांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत राजबीर पनवर याच्या फलंदाजीच्या जोरावर सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया संघाने दिल्ली हायकोर्ट संघाचा ५ गडी राखून पराभव करत स्पर्धेत विजेतेपद संपादन केलेे. खेळाडूंच्या कामगिरीमुळे सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया संघाच्या बाजूने ‘निकाल’ लागला.

गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटेनेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात दिल्ली हायकोर्ट संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ गडी गमावून १४० धावा धावफलकावर लावल्या. ऐंजल भारव्दाज याने ३९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया संघाच्या अजित राणा याने ३ गडी बाद केले. अक्षय कुमार आणि निमीश चंद्रा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून दिल्ली संघाच्या धावांना वेसण घातली.

सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया संघाने हे आव्हान १७.३ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. राजबीर पनवर याने ४६ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. राजबीर याने सलग दोन सामन्यांमध्ये १४९ आणि १२५ धावांची खेळी केली होती. आजही त्याने अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राजबीर आणि कर्णधार शौमेंदू मुखर्जी (२८ धावा) यांनी दुसर्‍या गड्यासाठी ४० चेंडूत ६० धावांची भागिदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. इतर फलंदाजांनी कोणतीही चूक न करता संघाला सहज विजय मिळवून दिला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारतीय संघाचे माजी वरिष्ठ खेळाडू आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तेलंगणा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष सुनिल गौड, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष राजेंद्र उमप, स्पर्धेचे संचालक अ‍ॅड. उमेश चांडोले, पुणे बार असोसिएशनचे रणधीर गोळे आदि मान्यवर उपस्थित होते.

विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि मेडल्स् देण्यात आले. मालिकेचा मानकरी आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया संघाच्या राजबीर पनवर याला मिळाला. सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाचा मान सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया संघाच्या निमीष चंद्रा याला मिळाला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम फेरीः
दिल्ली हायकोर्ट संघः २० षटकात ८ गडी बाद १४० धावा (ऐंजल भारव्दाज ६१ (३९, ८ चौकार, २ षटकार), यशवीर सिंग नाबाद २९, अजित राणा ३-३०, अक्षय कुमार २-२४, निमीश चंद्रा २-१७) पराभूत वि. सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया संघः १७.३ षटकात ५ गडी बाद १४१ धावा (राजबीर पनवर ७५ (४६, ९ चौकार, २ षटकार), शौमेंदू मुखर्जी २८, नवीन सिंग ३-२१);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी राजबीर आणि शौमेंदू यांच्यात ६० (४०); सामनावीरः राजबीर पनवर;

वैयक्तिक पारितोषिकेः
मालिकेचा मानकरी आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजः राजबीर पनवर (सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया, ३७७ धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकः निमीष चंद्रा (सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया, ८ विकेट);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading