स्ट्रीट फूड व्यवसायाला मिळतोय नावीन्याचा इंटरनॅशनल टच
पुणे: रस्त्यावरील हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ खाणे आजवर अस्वच्छता आणि आजारांना निमंत्रण देणारी बाब ठरत होती. आता मात्र, एशियन कंट्रीज् चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणजेच अकोहीच्या प्रदीर्घ संशोधनातून आविष्कृत करण्यात आलेल्या अमृतया अत्याधुनिक हातगाडीमुळे या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. महाराष्ट्रात पुण्यात अमृत फूड कार्टचा पहिला परवाना वाघोली भागातील मे. शिंदे चौपाटी यांना प्रदान करण्यात आला.
याबाबत बोलताना, अकोहीचे अध्यक्ष डॉ. सानी अवसरमल यांनी सांगितले, की रस्त्यावरील खाद्यपदार्थांची समस्या लक्षात घेता अमृत या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा हातगाडीची कल्पना आम्हाला सूचली. त्यावर अनेक वर्षे संशोधन व प्रयोग केल्यानंतर हे मॉडेल विकसित करण्यात आले. भारतच नव्हे तर आशिया, तसेच जगभरातील रस्त्यावरील संस्कृतीला या अभिनव व क्रांतिकारी संकल्पनेतून प्रगतीचा नवा स्पर्श लाभणार आहे. स्ट्रीट फूडच्या बाबतीत न्यूयॉर्क हे जगातील सर्वोत्तम शहर मानले जाते. तरीही, आम्ही विकसित केलेले मॉडेल जगभरात कुठेही आढळणार नाही, याची आम्हाला खात्री वाटते. अमृत फूडकार्ड या अत्याधुनिक हातगाडीचे हे उत्पादन आविष्कृत करण्यासाठी आम्हाला संशोधन आणि विकास प्रक्रियेत ७ वर्षे लागली.
खाद्यपदार्थांची गरज, स्थिती, प्राधान्य, स्वच्छता, सुरक्षितता, ग्राहकांची पसंती आणि भारत सरकारचे धोरण या सर्व बाबींना केंद्रस्थानी ठेऊन आम्ही आमच्या प्रिय देशासाठी ही संकल्पना अत्यंत काळजीपूर्वक विकसित केली आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. या नावीन्यपूर्ण उत्पादनामुळे स्ट्रीट फूडच्या क्षेत्रात आपला भारत संपूर्ण आशिया खंडात अग्रेसर ठरु शकतो, असा आम्हाला विश्वास आहे. आपण भारतीय स्ट्रीट फूडसाठी ओळखलो जातो, मात्र आम्ही त्यास योग्य तो सन्मान देत नाही. आमच्या या प्रयोगातून आम्ही या क्षेत्राला तो सन्मान देऊ पाहतो आहोत. या फ्रॅंचायजी मॉडेलच्या माध्यमातून आमच्याशी जोडले जाणाऱ्या विक्रेत्यांनाही यातून आर्थिक स्वातंत्र्य लाभणार आहे, असेही डॉ. अवसरमल यांनी नमूद केले.
