‘है तैयार हम…’ लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत – माजी आमदार मोहन जोशी
लाखोंच्या उपस्थितीत नागपूर महारॅलीत रणशिंग फुंकणार…
पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘है तैयार हम’ अशा निर्धाराने काँग्रेस कार्यकर्ते सज्ज झाले असून, नागपूर येथे दि.२८ डिसेंबर रोजी होणाऱ्या विशाल रॅलीत लाखोंच्या संख्येने सहभागी होतील, अशी माहिती माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३९व्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे ‘है तैयार हम’ महारॅली आयोजित करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा खासदार श्रीमती सोनियाजी गांधी, पक्षाचे नेते खासदार राहुलजी गांधी, श्रीमती प्रियांकाजी गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, देशातील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही रॅली होणार आहे. या महारॅलीमध्ये लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला अनुकूल वातावरण तयार झाल्याची मतं ताज्या सर्व्हेंमधून दिसून आलेली आहेत. या वातावरणात लक्षावधी कार्यकर्ते नागपूर येथील महारॅलीत सहभागी होतील. पुणे शहर आणि जिल्ह्यातूनही शेकडो कार्यकर्ते रॅलीत सहभागी होण्यासाठी नागपूरकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती मोहन जोशी यांनी पत्रकात दिली आहे.
देशात लोकशाही टिकविण्याचा निर्धार काँग्रेसजनांनी केलेला आहे. दलित, अल्पसंख्याक यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला विरोध, महागाई, बेरोजगारी याचा निषेध आणि १४६ खासदारांना निलंबित केल्याचा जाब या महारॅलीत सरकारला विचारला जाईल. महारॅलीत कार्यकर्त्यांना प्रेरणादायी संदेश दिला जाईल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
