आबेदा इनामदार महाविद्यालयाला विजेतेपद
पुणे : पुणे शहर क्रीडा समिती व आप्पासाहेब जेधे महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुणे शहर आंतर महाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेत आबेदा इनामदार महाविद्यालय संघाने मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर संघाला ९ धावांनी पराभूत करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या लढतीमध्ये आबेदा इनामदार महाविद्यालय संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद १८९ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना जाई शिंदेने ३८ चेंडूत ६५ धावा तडकावल्या. तिला संजीवनी पवारने २० चेंडूत ४० तर कर्णधार नियती जाधवने ३४ चेंडूत ३१ धावा करताना सुरेख साथ दिली. मॉडर्न महाविद्यालय संघाकडून शरयू कुलकर्णी व पूर्वा जगताप यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
मॉडर्न महाविद्यालय संघाला निर्धारित २० षटकांत ३ बाद १८० धावाच करता आल्या. सानिया गावडेने ५० चेंडूत ६८ तर आर्शिया जमादारने ३८ चेंडूत ४९ धावा करताना १२० धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर संजीवनी पवार व नियती जाधव यांनी दोघीना बाद करताना पुन्हा लढतीवर पकड मिळविताना मॉडर्न संघाला १८० धावांवर रोखले.
तत्पूर्वी तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालय संघाने आरएमडी सिंहगड एसटीआयसी महाविद्यालय संघाला तब्बल ९६ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना कमिन्स संघाने निर्धारित १० षटकांत नाबाद १३० धावा केल्या. यामध्ये सानिया पटेलने ३२ चेंडूत ५१ तर वैष्णवी पाटीलने ३१ चेंडूत ४५ धावा केल्या. आरएमडी सिंहगड संघाला निर्धारित १० षटकांत ७ बाद ३४ धावा करता आल्या. सानिया पटेलने भेदक गोलंदाजी करताना ३ षटकांत ७ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले. मानसी घुनेने २ तर वैष्णवी पाटील व निधी लोयाने प्रत्येकी एक गडी बाद केला.
या स्पर्धेसाठी डॉ. शांताराम ढमाले, डॉ. गुलझार शेख व प्रा. गौतम शिंदे यांनी निवड समितीचे सदस्य म्हणून काम पहिले.
आबेदा इनामदार महाविद्यालयाने केलेल्या चमकदार कामगिरीसाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव प्रा. इरफान शेख, प्राचार्या डॉ. शैला बुटवाला, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक व प्रशिक्षक डॉ. गुलजार शेख यांनी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
