‘बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांसाठी’ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम
पुणे : भारतीय रिझर्व बँक ही नागरी सहकारी बँकांच्या नियमामध्ये सातत्याने सुधारणा व बदल करत आहे. त्याचबरोबर नवनवीन बंधने घालण्यात येत आहेत. रिझर्व बँकेने सक्षम आणि सुयोग्य मुख्य कार्यकारी अधिकारी असावा, असे बंधन नागरी सहकारी बँकांवर घातले आहे. त्यामुळे आता बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना उत्तमरीत्या तयार करण्याकरिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम साकारण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ व पुणे नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र) च्या वतीने याबाबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अॅड.साहेबराव टकले, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ.अनिल कारंजकर आदी उपस्थित होते.
अॅड. सुभाष मोहिते म्हणाले, अनुभवी व कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी मिळण्यामध्ये नागरी सहकारी बँकाना अडचणी येत आहेत. यावर पर्याय उपलब्ध करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाशी संपर्क साधून एक पदविका अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमासाठी नागरी सहकारी बँकेमध्ये किमान १० वर्षे काम केल्याचा अनुभव लागणार असून कमाल वय ४५ वर्षे असेल अशा अधिकारी वर्गाला प्रवेश घेता येईल.
डॉ. पराग काळकर म्हणाले, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (पीजी डिप्लोमा) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) बनविण्यात येत असून या पदविका अभ्यासक्रमाद्वारे मिळणारे क्रेडिट गुणतालिका उत्तीर्ण अधिकाऱ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी व गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयोगी पडेल. पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र) ने हे एक अतिशय धाडसाचे पाऊल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने टाकले आहे. हा आपल्या देशातील पहिलाच प्रयोग आहे.
हा पद्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाबरोबर वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे, विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना असोसिएशन मार्फत प्रत्यक्ष कामावर अनुभव देता येईल, अशी विविध उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.
