Saturday, April 4, 2026
Latest NewsPUNE

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा

पुणे  : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत पुणे जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे विविध ठिकाणी मतदान नोंदणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिराअंतर्गत २ लाख ७९ हजार ४७९ इतक्या सर्वाधिक नवमतदारांची नोंदणी करून पुणे जिल्ह्याने चांगले कार्य केले आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त तथा पुणे विभागासाठीचे मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या दूरदृष्यप्रणालीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त रामचंद्र शिंदे, वर्षा लड्डा-उंटवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, स्वीप समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मागील पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षी नव मतदारांची खुप मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे. मतदार यादीत अजूनही ११० ते ११९ वयोगटातील मतदार दिसत आहेत. त्याची मतदार नोंदणी अधिकारी यांनी वैयक्तिक पडताळणी करावी.

पुणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय सहायक यांची नियुक्ती राजकीय पक्षांद्वारे करण्यात आली नाही, त्या नियुक्त्या करून घ्याव्यात. जिल्ह्यात ५४२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. एकही मतदान केंद्र केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशिवाय राहता कामा नये. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना रूजू करुन घेण्यासाठी कार्यवाही करावी. रुजू न होणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे.

मतदार यादीतील नावे वगळतांना तसेच अर्ज नाकारतांना योग्य कारणमिमांसा करूनच कार्यवाही करावी. पुणे जिल्ह्यात अधिक अर्ज नाकारण्यात आले आहेत. अर्ज नाकारण्यापूर्वी त्यात शक्य असल्यास दुरुस्त्या करून घ्याव्यात. ज्या ठिकाणी अर्ज नाकारण्याची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. मतदार याद्यांच्या पुनरीक्षण काम अत्यंत दक्षतेने आणि गांभीर्याने करावे.

मतदार जनजागृतीसाठी राजकीय पक्ष, प्रसार माध्यमे, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. मतदार जागृतीसाठी प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वांचे सहकार्य घ्यावे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या तारखेनंतरही मतदार नोंदणी करता येते याविषयी जनजागृती करा, असेही ते म्हणाले. मतदार यादीतील तपशीलातील दुरुस्ती करण्याची प्रक्रिया संपूर्ण दक्षता घेऊन राबवावी. अंतिम यादी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून अंतिम यादीत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहता कामा नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी श्री. राव यांनी दिल्या.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती कळसकर म्हणाल्या, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत २ लाख ७९ हजार ४७९ इतक्या सर्वात जास्त नव मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मागील दहा दिवसात १ लाख ५४ हजार ३५४ अर्ज भरून घेण्यात आले. त्यापैकी १ लाख ४४ हजार ३२० अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. विशेष संक्षिप्त पुररीक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. राव यांनी यावेळी पुनरीक्षण मोहिमेदरम्यान प्राप्त अर्ज नमुने ६, ७, ८ आदींचा सविस्तर आढावा घेतला. मतदार नोंदणी, वगळणी, स्वीप कार्यक्रम आदी आढावा घेतला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती कळसकर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच स्वीप कार्यक्रमाअंतर्गत नव मतदार नोंदणी साठी घेतलेल्या विविध शिबिरांची माहिती श्रीमती तांबे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading