पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांची तुडुंब गर्दी
पुणे पुस्तक महोत्सवांतील दालनांमध्ये असलेली पुस्तके पाहणे, पुस्तकांची खरेदी, सांस्कृतिक कार्यक्रम, वैविध्यपूर्ण उपक्रमांना पुणेकरांनी तुडुंब गर्दीने प्रतिसाद दिला. त्यामुळे पुणेकरांचा रविवार खऱ्या अर्थाने प्रसन्नरित्या साजरा झाला.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदावावर पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात रविवारी लहान मुलांसाठी द मॅजिक ऑफ वर्ड्स हे स्टोरी टेलिंगचे सत्र, ओरिगामी कार्यशाळा, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांचा सुट्टी आली, सुट्टी आली हा कार्यक्रम, यंग पिकासोज ही इलस्ट्रेशन्सची कार्यशाळा, टॅलेंट हंट, ऋचा लिमये यांचा अ सिम्बायोसिस ऑफ वर्ल्ड लिटरेचर, सायंकाळी शक्तीदात्री – द लिबरेशन ऑफ सीता अशी विविध सत्रे झाली. तर, तुकाराम दर्शन हे महानाट्य सादर झाले.
रविवारच्या सुटीचा योग साधून मोठ्या संख्येने पालक मुलांना घेऊन महोत्सवात दाखल झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेत, त्यांना प्रतिसाद दिला. तसेच स्टोरीटेलिंग, इलस्ट्रेशन्सची कार्यशाळा, टॅलेंट हंट अशा कार्यक्रमांमध्ये मुले उत्साहात सहभागी झाली. तसेच महोत्सवात असलेल्या विविध भारतीय भाषांतील पुस्तकांची दोनशेहून अधिक दालने फिरून पुस्तकांची खरेदीही आवर्जून करण्यात आली. या प्रदर्शनात धार्मिक, अध्यात्मिक साहित्याच्या पुस्तकांपासून ललित साहित्य, अनुवाद, स्पर्धा परीक्षा, शिक्षण, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अशा विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे पालक, मुले, युवा वर्ग या पुस्तकांमध्ये दिवसभर रमून गेले. त्यामुळे पुस्तक महोत्सवाला रविवारी प्रचंड गर्दी झाली होती.
पुणे पुस्तक महोत्सवात विविध भाषांतील पुस्तकांची दोनशेहून अधिक दालने आहेत. दररोज वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी पुणे पुस्तक महोत्सवाला आवर्जून भेट दिली पाहिजे. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासचे युवराज मलिक यांनी उत्तम नियोजन केले आहे. त्यासाठी त्यांना धन्वयाद दिले पाहिजेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर पुण्यात पहिल्यांदाच पुस्तक महोत्सव होत आहे
- प्रकाश जावडेकर, खासदार
महोत्सवात सोमवारी होणारे कार्यक्रम
स्टोरी टेलिंग – सकाळी १०.३०
विद्यार्थ्यांसाठी मंडाला आर्ट कार्यक्रम – सकाळी ११.३०
वेदिक मॅथेमॅटिक्स – दुपारी १२.३०
टॅलेंट हंट – दुपारी १.३०
कवि की कलम से – कुमार विश्वास, उपस्थिती – विनोद तावडे – दुपारी १.३० (ॲम्फी थिएटरमध्ये)
पत्रकार सौरभ द्विवेदी यांच्याशी संवाद – सायंकाळी ४ (ॲम्फी थिएटरमध्ये)
स्वातंत्र्यवीर सावरकर – समज आणि गैरसमज – विक्रम संपत – सायंकाळी ५.३० (ॲम्फी थिएटरमध्ये)
काश्मिरी बँडचे सादरीकरण – सायंकाळी ६.३०
