Monday, August 31, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

यामिनी रेड्डी यांचा खिळवून ठेवणारा पदन्यास; कुचीपुडी नृत्याविष्काराने जिंकली रसिकांची मने

पुणे : ‘सवाई’च्या व्यासपीठावर सादर होणारा नृत्याविष्कार हे रसिकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र असते. यावर्षी प्रसिद्ध नृत्यांगना यामिनी रेड्डी यांच्या कुचीपुडी नृत्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यांच्या खिळवून ठेवणाऱ्या पदन्यासाने आणि दर्जेदार अभिनयाने रसिकांची मने जिंकून घेतली.

सुरवातीला ‘वक्रतुंड महाकाय’ या गणेशस्तुतीने वादकांनी सुरवात केल्यावर नृत्यांगना यामिनी रेड्डी यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्यांनी सरस्वती वंदना सादर केली. विद्या आणि कलांची अधिष्ठात्री देवता असणाऱ्या देवी सरस्वतीचे मनोहर रूपवर्णन यामिनी यांनी श्लोकातील शब्दांचा मागोवा घेत दर्शवले.

त्यानंतर यामिनी यांनी शिव देवतेचे ‘नवरसदर्शन’ घडवणारी रचना समर्थ अभिनयाचा प्रत्यय देत सादर केली. शृंगार, वीर, करुण, हास्य, वीर, भय,  रौद्र, बिभत्स.. असे रसभावदर्शन त्यांनी प्रेक्षकांना घडवले. शिवाचे तांडव करणारे रूप या नवरसांतून त्यांनी देहबोलीतून, पदन्यासातून यामिनी यांनी प्रदर्शित केले. त्यांच्या या वर्णनात्मक नृत्याविष्काराने प्रेक्षकांना अक्षरशः अवाक् केले.

कुचीपुडी नृत्याचा स्थायीभाव मानल्या जाणाऱ्या पारंपरिक स्वररचना आणि कृती यांचा नृत्यसंरचनेसाठी कल्पक वापर करत यामिनी यांनी नंतर पं. भीमसेन जोशी यांच्या प्रसिद्ध ‘भज मन रामचरण सुखदायी ‘ या भक्तिरचनेवर नृत्याविष्कार पेश केला. यामध्ये रामकथेतील अनेक प्रसंगांची गुंफण त्यांनी केली होती. यामिनी यांच्या अभिनयाचे, मुद्रांचे आणि पदन्यासाचे अतिशय सुंदर दर्शन यावेळी घडले. नृत्याविष्काराची सांगता कुचीपुडी नृत्यपरंपरेतील थाळीनृत्याने करताना, यामिनी यांच्या पदन्यासातील असामान्य समतोल दिसला आणि ‘शिव शिव भव शरणं’ या रागमालिकेत तसेच थाळीनृत्यात बोलका मुद्राभिनय व मृदंगम सोबत सवाल जबाबही रसिकांची दाद मिळवून गेले.

यामिनी रेड्डी यांना गुरू कौशल्या रेड्डी (नटुअंगम), डॉ. अदिती शर्मा गर्ग आणि डी. व्ही. रविकांत (गायन), मनोहर बालचंद्र (मृदंग म), व्ही एस के अण्णादुराई (व्हायोलिन) आणि अझरुद्दीन शेख (बासरी) यांनी अनुरूप साथसंगत केली.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज महोत्सवाला भेट दिली. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक कलाकाराच्या सादरीकरणापूर्वी, परिचयपर दृकश्राव्य फित सादर केली जाते. या ध्वनिचित्र फितीसाठी अनेक वर्षे आपला आवाज देणाऱ्या आनंद देशमुख (मराठी भाषेतील आवाज) आणि डॉ. पूर्वा शहा (इंग्रजी भाषेतील आवाज) यांचा विशेष सन्मान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading