Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

अखिल मंडई मंडळातर्फे १४५० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी 

पुणे : अखिल मंडई मंडळ आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते. यामध्ये १४५० नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करत शिबिराचा लाभ घेतला. महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी देखील यावेळी करण्यात आली.
शुक्रवार पेठेतील शारदा गजानन मंदिरा शेजारील पटांगणात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  शिबिराचे उद्घाटन आरोग्यसेनेचे संस्थापक हृदयरोगतज्ज्ञ  डाॅ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स  क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर विजय भंडारी, उपजिल्हाअधिकारी मिनल कळसकर, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, सचिव विश्वास भोर, अभय थोरात, श्याम खंडेलवाल उपस्थित होते.
यावेळी स्तन कर्करोग तपासणी, डोळे तपासणी, चष्मा वाटप, नाक, कान, घसा, दात, त्वचारोग, हाडांची तपासणी करण्यात आली. शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अभिजित वैद्य म्हणाले, देशापुढे आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत. अनेक आजार असे आहेत जे लोकांना माहित देखील नाहीत. यासाठी आम्ही सातत्याने लोकांना जागृत करण्याचे प्रयत्न करतो. लोकांनी देखील नियमित आरोग्य तपासणी करुन घ्यायला हवी.
विजय भंडारी म्हणाले, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि गणेशोत्सव मंडळ यांनी मिळून मिसळून काम केले तर समाजासाठी उपयुक्त असे उपक्रम राबविता येतात. आज लोकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रयत्न कऱण्याची गरज आहे. ते अशा प्रकारच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून करता येणे शक्य आहे.
अण्णा थोरात म्हणाले, मंडई परिसरात कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कामाच्या निमित्ताने अनेक कष्टकरी या भागात येतात.  शिबिराच्या माध्यमातून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामुळे काही आजार असतील तर निदान होऊन प्रतिबंधात्मक उपचार करण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading