Wednesday, June 17, 2026
Latest NewsSports

पुण्यात रंगणार ‘वाॅटर पोलो’ स्पर्धांचा थरार

पुणे  – पाण्यातला फुटबाॅल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाॅटर पोलो स्पर्धांचा थरार पुण्यात रंगणार आहे. येत्या १३ ते १७ डिसेंबर दरम्यान डेक्कन जिमखान्याच्या टिळक तलावावर अखिल भारतीय क्लब पातळी स्पर्धा होणार आहेत. भारतीय जलतरण महासंघाने (स्विमिंग फेडरेशन आॅफ इंडिया) डेक्कन जिमखान्याच्या सहकार्याने या स्पर्धा आयोजित केल्या असून ‘कटककर करंडक’ या नावाने ही स्पर्धा खेळवली जाईल.
वाॅटर पोलो हा आॅलिंपिक मान्यताप्राप्त खेळ आहे. भारतात पुण्यासह अनेक ठिकाणी हा खेळ खेळला जातो. डेक्कन जिमखान्यावर साठच्या दशकापासून हा खेळ खेळला जात आहे. या वर्षी भारतीय जलतरण महासंघाने डेक्कन जिमखान्याची निवड स्पर्धेचे आयोजक म्हणून केली आहे. डेक्कन जिमखान्याचे सभासद आणि कटककर उद्योग समूहाचे प्रमुख श्री हेमंत कटककर यांनी ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. स्वतः कटककर हे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आहेत. ता. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्री. कटककर यांच्या हस्ते कटककर ट्राॅफीचे अनावरण होणार आहे.
या वर्षी या स्पर्धेत डेक्कन जिमखान्याच्या संघासह मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे, नौदल, वायूदल, अमरावती, रसायनी रायगड, मध्य प्रदेशातील सिल्वर शाईन क्लब, कोलकत्त्यातील खिदरपूर क्लब यांच्यासह बंगळुरू, केरळ, राजकोट येथील संघांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धा लिग पद्धतीने खेळवल्या जाणार असून क्रिडा रसिकांना पुण्यात पहिल्यांदाच अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडू्ंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. सकाळी ८ पासून स्पर्धांना सुरुवात होईल. टिळक तलावाचे सचिव अमित गोळवलकर, पुणे हौशी जलतरण संघटनेचे सचिव जय आपटे हे सर्धा सचीव असून श्रीमती निता तळवलीकर या समन्वयक आहेत.
या स्पर्धेच्या निमित्ताने ता. १२ रोजी वर्ल्ड अॅक्वॅटिक्स (पूर्वीची फिना) या आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाच्या वतीने वाॅटर पोलोच्या प्रसारासाठी १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी आखलेल्या ‘प्ले विथ द बाॅल’ या कार्यक्रमाचे आॅल इंडिया लाँच होणार आहे. टिळक तलावावर १२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय जलतरण महासंघाचे महासचिव मोनल चोक्सी, वर्ल्ड अॅक्वॅटिक्स संघटनेचे ब्युरो सदस्य विरेंद्र नानावटी, आंतरराष्ट्रीय रेफ्री कमलेश नानावटी, डेक्कन जिमखान्याचे जनरल सेक्रेटरी गिरीश इनामदार, फायनान्स सेक्रेटरी मिहिर केळकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading