गगन नारंगचे फाउंडेशन व वॉल्थरतर्फे पॅरिस कोटा विजेत्या नेमबाजांना सहकार्य
आज झालेल्या पत्रकार परिषदेत लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेते नेमबाज तसेच गन फॉर ग्लोरी नेमबाजी अकादमीचे सह-संस्थापक आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) उपाध्यक्ष पद्मश्री गगन नारंग यांनी संबोधित केले. यावेळी जर्मनी येथील कार्ल वॉल्थर जीएमबीएच, या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नहार्ड नोबेल, कंपनीच्या वितरण विभागाचे संचालक द्रागर क्लाऊस, हाय रायफल प्रशिक्षक, जागतिक दर्जाचे खेळाडू व ५ वेळा ऑलिम्पिक पदक विजेते पीटर सीडी, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) चे संयुक्त सचिव आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ (आयएसएसएफ) चे पंच समिती सदस्य पवन सिंह आदी यावेळी उपस्थित होते.
“भारतीय नेमबाजांनी जास्तीत जास्त ऑलिम्पिक पदके जिंकावीत हे आमचे स्वप्न वॉल्थरसारख्या कंपनीने देखील पहावे आणि अशा पद्धतीने आम्हाला सहकार्य करावे हा आमच्यासाठी अभिमानाचा आणि समाधानाचा क्षण आहे. कित्येक स्पर्धांच्या प्रत्येक संभाव्य स्तरावर पदक जिंकण्याकरीता मी वैयक्तिकरित्या वॉल्थरच्या रायफल्स वापरल्या आहेत. ऑलिम्पिकमध्ये इतर भारतीय नेमबाजांना पदक जिंकून देण्याच्या आमच्या प्रयत्नात ही दिग्गज कंपनी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे, हे खरोखरच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,” असे नारंग यांनी सांगितले.
नारंग पुढे म्हणाले की, वॉल्थर ही नेहमीच गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री देते. त्यांच्या रायफल्स तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम आणि प्रगत आहेत. पॅरिस ऑलिम्पिक कोटा प्राप्त खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या रायफल्स त्यांना केवळ अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठीच नव्हे तर स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकण्यास देखील मदत करतील, असा माझा विश्वास आहे.
यावेळी बोलताना बर्नहार्ड नोबेल म्हणाले, “भारतीय नेमबाजांसोबतचे असलेले आमचे संबंध हे मैत्रीपूर्ण आणि जुने आहेत. जीएनएसपीएफ सोबत आम्हालाही भारतीय नेमबाज सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत त्यांना चांगली कामगिरी करताना पाहायचे आहे. अव्वल भारतीय नेमबाज वॉल्थर रायफल्सवर विश्वास ठेवतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करतात हा आमचाही सन्मान आहे, असे आम्ही समजतो भारतामध्ये हजारो प्रतिभावान नेमबाज असून वॉल्थर ही जगातील आघाडीची बंदूक निर्माता कंपनी आहे, त्यामुळे आम्ही एकत्रितपणे अनेक विजेते नेमबाज घडवू शकू.”
जागतिक स्पर्धेचे विजेते आणि गन फॉर ग्लोरीचे नेमबाज रुदांक्ष पाटील यावेळी बोलताना म्हणाले, “स्पर्धेसाठी तयारी करत असताना या टप्प्यात ही मदत आमच्यासाठी मोलाची आहे. नेमबाजीत अचूकता ही खूप महत्त्वाची असते आणि प्रत्येक गन बनविताना वॉल्थर ही अचूकता जपण्याची काळजी घेते. यामुळे पॅरिस ऑलिम्पिक पूर्वी चांगली कामगिरी करण्यास यामुळे मला मदत होणार आहे.”
मेहुली घोष यावेळी बोलताना म्हणाल्या, “मी जी पहिली रायफल पाहिली होती ती वॉल्थरची होती. तेव्हापासून मी स्पर्धेत कमावलेला प्रत्येक गुण आणि जिंकलेले प्रत्येक पदक हे याच कंपनीची रायफल वापरून जिंकले आहे. आज ही अत्याधुनिक रायफल मिळाल्याचा मला फार आनंद आहे.”
पॅरिस ऑलिम्पिकसाठी पॅरालिम्पिक कोटामध्ये सहभागी होण्याच्या प्रयत्नांत असलेले स्वरूप उन्हाळकर म्हणाले, “गन फॉर ग्लोरी, गगन नारंग सर आणि पवन सिंग हे पॅरा स्पोर्टसाठी खूप महत्त्वाचे काम करत आहेत हे पाहून आनंद होतो. त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आणि वॉल्थरचा आभारी आहे. याची माझ्या पुढील प्रवासात खूप मदत होईल.”
