कीर्तन महोत्सवात नारदीय कीर्तनाचा गजर !
पुणे: भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित ‘कथा कीर्तन महोत्सव’ मध्ये चौथ्या दिवशी गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी ,सायंकाळी ६ वाजता श्रेयस कुळकर्णी यांनी नारदीय कीर्तनाचा भक्तिमय आविष्कार पुणेकरांना घडविला ! पारंपारीक पद्धतीने त्यांनी नारदीय कीर्तन सादर केले तसेच भक्त त्यागराज यांच्या भक्तीची महती गायली.’राम गावा, राम घ्यावा, राम जिवीचा विसावा’ हा संत रामदासांचा अभंग आणि त्याचे निरूपण त्यांनी या दरम्यान सादर केले.
पुणेकर रसिकांचा या कीर्तनाला चांगला प्रतिसाद मिळाला .
महाराष्ट्रातील शेकडो वर्षांच्या कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कथा कीर्तन महोत्सवात हे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
भारतीय विद्या भवन बंगळुरू केंद्राच्या सह संचालक नागलक्ष्मी राव, ज्येष्ठ नेते ऍड. श्रीकांत शिरोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले आणि सूत्रसंचालन केले.
श्रीकांत शिरोळे म्हणाले “पूर्वीपासून कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती केली गेली. सांस्कृतिक आनंदाचा ठेवा म्हणून त्याकडे पाहिले जात होते.परमेश्वराबरोबर संवाद साधण्याचे साधन किर्तन हे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देखील देशप्रेम पसरविण्यासाठी हे माध्यम उपयुक्त ठरले. सर्व धर्मात परमेश्वर चरणी लीन होण्याचे मार्ग सांगीतले आहेत.
भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहामध्ये या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय विद्या भवन तर्फे करण्यात आले आहे.प्रवेश मोफत आहे.
