Tuesday, September 1, 2026
BLOGLatest News

भारतीय संविधान : अमृत महोत्सव वाटचाल

 

इंग्रजांच्या जोखडातून देश १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र झाला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीकडून संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० पासून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली. भारतीय स्वातंत्र्याचे हिरक महोत्सवी वर्ष २००७ साली साजरे झाले. देश स्वातंत्र होऊन ६० वर्षे झाली, पण संविधानाने नमूद केलेले स्वातंत्र्य या देशातील नागरिकांना मिळते आहे का ? देशामध्ये समता, बंधुता, न्याय नांदतो आहे का ? देशाच्या संसदेपासून ते गावच्या वाडीवस्ती, पाड्यांपर्यंतची स्थिती पाहता, एक ना अनेक प्रश्नांचे काहूर या काळात डोक्यात निर्माण झाले. संविधानातील मूल्यआशय जनमानसात रुजवण्यापासून ते अधिकार आणि कर्तव्यांबद्दल मोठे काम करण्याची संकल्पना डोक्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून काम करण्याची योजना मांडली गेली. संविधान विषय पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी उचलली आणि पहिला संविधान बांधिलकी महोत्सव २६ जानेवारी ते ३० जानेवारी २००७ या काळात घडवून आणला. २०१६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झालेल्या १२५ व्या जयंतीवर्षांपासून संघटनेकडून २६ नोव्हेंबर ते २६ जानेवारी असा सलग दोन महिने हा महोत्सव साजरा केला जात आहे. सलग १६ वर्षे हा महोत्सव सुरू असून आज मागे वळून पाहिले तर असे दिसते की, राज्यात आणि देशात देखील पहिल्यांदा असे संघटित स्वरूपात संविधानासंबंधी काम करणारी महा. अंनिस ही एकमेवाद्वितीय संघटना आहे. आज या कामाची किती गरज आहे हे अनेकांच्या लक्षात आले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्या संघटनेचा आणि संविधानाच्या कामाचा काय संबंध ? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण एका वाक्यात सांगायचे झाले तर संघटनेचे काम हे संविधानाचा मूल्यआशय वृद्धिंगत करणारे आहे. जिथे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असतो तिथे अंधश्रद्धेचा प्रभाव असतो. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या कर्तव्यामध्ये नमूद असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, प्रचार आणि अंगीकार करण्यास संघटना कटिबद्ध राहिली आहे. इतकेच नव्हे तर शोषणमुक्त समाज हा भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत आहे आणि संघटना नागरिकांना अंधश्रद्धेतून मुक्त करून शोषणमुक्त करत आहे. सामाजिक न्याय हा तर भारतीय राज्यघटनेचा गाभा आहे आणि संघटना ही अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देत आली आहे. जातीभेद उच्चाटन हा भारतातील जटिल प्रश्न आहे. संघटनेने या प्रश्नाच्या उच्चाटनासाठी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांपासून ते जातपंचायतीला मूठमाती देण्यापर्यंत काम केलेले आहे. ही सगळी संघटनाअंतर्गत कामे करत असताना त्याला मोठ्या प्रमाणात संविधानिक तत्त्व आणि मूल्य आशयाची जोड दिल्याने प्रश्नांकडे पाहण्याची व्यापकता वाढली आणि कामाला गती येऊन कामाचा वाढविस्तार झाला आहे. या सगळ्याच कामातून संविधानिक मूल्यआशय वृद्धिंगत झाला आहे.

महोत्सव सुरू करताना सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर पोस्टर, स्टिकर्स, बॅनर तयार करून घेण्यात आले, त्याचे प्रदर्शन केले. तर दुसऱ्या बाजूला दिवंगत विधीतज्ञ एन. डी. सूर्यवंशी आणि आम्ही दोघांनी ‘भारतीय संविधानाचे अंतरंग’ ही संविधानासंबंधी अत्यंत अचूक, नेमकी माहिती देणारे पुस्तक तयार केले. या पुस्तकाच्या आजवर हजारो प्रति विकल्या गेल्या असून संविधानासंबंधाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरले आहे. ‘चालता बोलता संविधान’ हा साधा- सोपा, पण अत्यंत प्रभावी उपक्रम संघटनेने राबवून मोठी जनजागृती घडून आणली. नागरी वस्त्यांमध्ये राष्ट्रध्वज उभारणी केली. कष्टकरी महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यास सुरुवात केली. नागरिकांमध्ये ध्वजसंहितेसंबंधी असणारी भीती दूर करून ध्वजासंबंधीचा सन्मान वाढवला. संघटनेने मोठ्या प्रमाणात ध्वज खरेदी करून त्याचे वाटप केले. संविधानासंबंधी काम करणार अनेक गट, संस्था तयार होत असताना त्यांना बळ देण्याचे काम संघटनेने केले आहे. संविधानासंबंधी कार्यकर्त्यांची प्रशिक्षणे घेतली, शिबिरे घेतली. संविधानासंबंधी रिंगण नाटकाद्वारे प्रबोधन केले. संविधानाची गाणी, पोवाडे, भजने तयार करून त्याद्वारे मनोरंजनातून प्रबोधन घडवून आणले आहे. विविध माध्यमांचा वापर करून संविधानिक मूल्य रुजवणुकीचा प्रयत्न राहिला आहे.

संविधानाच्या ७५ वर्षांमध्ये संविधानाला अभिप्रेत असणारी वाटचाल झाली का ? तर याचे उत्तर आज भयावह आणि अस्वस्थ करणारी स्थिती आहे. पूर्वीच्या तुलनेत २०१४ पासून ही भयावता आणि अस्वस्थता अनेक बाजूंनी वाढलेली आहे. हे लक्षात आल्याने २०१४ पासून अनेक संस्था, संघटना आणि व्यक्ती पुढाकार घेऊन संविधानिक मूल्यांची जनजागृती आणि रुजवणुकीसाठी प्रयत्नशील झाले आहेत. तरीही हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. संविधानिक मूल्य रुजवणुकीचे काम हे व्यापक संघटित पद्धतीने करण्याचे आहे. त्यामुळे पुढील २५ वर्ष डोक्यात ठेवून संविधानाच्या मूल्यआशय रुजवणुकीसाठी आताच एकत्रित येऊन संघटितपणे काम करत पुढे जाण्याची गरज आहे. संविधानाचा मूल्यआशय रुजवणुकीसंबंधीचे प्रसार, प्रचार साहित्य, साधने आमच्याकडे उपलब्ध आहेत. आवश्यक असल्यास संपर्क करावा ही नम्र विनंती.

● अविनाश पाटील
अध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
संकल्पना व प्रवर्तक, संविधान बांधिलकी महोत्सव

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading