ओरिगामीचे ‘वंडरफोल्ड’ प्रदर्शन येत्या २३ नोव्हेंबर पासून
पुणे :: इंदुताई टिळक कला केंद्र व ओरिगामी मित्र यांच्या वतीने ‘वंडरफोल्ड २०२३’ या ओरिगामी कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे दिनांक २३ ते २६ नोव्हेंबर या काळात सकाळी १० ते रात्री ८ या काळात प्रेक्षकांसाठी खुले असेल. सदर प्रदर्शनाची ही १७ वी आवृत्ती असून हे प्रदर्शन दर दोन वर्षांनी भरविण्यात येत असते. परंतु कोरोनामुळे चार वर्षांच्या खंडानंतर हे प्रदर्शन होत आहे अशी माहिती आयोजन समितीचे सदस्य व ओरिगामी कलाकार मिलिंद केळकर यांनी दिली.



कागदाच्या वैशिट्यपूर्ण घड्या घालून विविध प्रतिकृती साकारणारी ओरिगामी ही एक जपानी कला असून या प्रदर्शनात सुमारे ३५ ते ४० कलाकारांच्या ३५० ते ४०० कलाकृती बघण्यास उपलब्ध असतील. त्यामध्ये, सुंदर लँप शेड, प्राणी, फुलं, मानव, विविध वस्तू व आकर्षक डिझाईनच्या छोट्या कागदी प्रतिकृती प्रदर्शित करण्यात येतील. प्रदर्शनाचे उद्घाटन वास्तुविशारद नरेंद्र डेंगळे व शिल्पकार सतीश घाटपांडे यांच्या हस्ते २३ नोव्हेंबरला सकाळी १०:३० वाजता होईल. प्रदर्शन पाहण्यासाठी देणगी प्रवेशिका प्रतिव्यक्ती रुपये २० फक्त इतकी आहे.