गुणवत्ता वाढीसाठी कलाकाराला योग्य वेळी दाद मिळणे आवश्यक : डॉ. उमा कुलकर्णी
पुणे : नवकवींना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबच त्यांच्या कलाकृतींना पुरस्काराच्या माध्यामातून दाद देण्याचा करम प्रतिष्ठानचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कलाकाराच्या कलाकृतीला योग्य वेळी दाद मिळाल्यास त्या कलाकाराला स्वत:च्या अभ्यासातून आपली गुणवत्ता सिद्ध करण्यास संधी मिळू शकते त्याचप्रमाणे कलाकारातील आत्मविश्वास वाढीस लागू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. उमा कुलकर्णी यांनी केले.
करम प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या करम साहित्यतेज पुरस्काराने प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांचा आज (दि. 19) गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजक-निमंत्रक करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन आणि वर्षा कुलकर्णी व्यासपीठावर होते.
सुरुवातीस भूषण कटककर यांनी प्रास्ताविकात करम प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा सादर केला आणि कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
कवी, लेखक तसेच गजझकारांसाठी करम प्रतिष्ठान जिद्दीने करीत असलेल्या कार्याचा गौरव करून डॉ. उमा कुलकर्णी म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात गुणवत्तेला खूप महत्त्व आहे. शिक्षणासह कुठल्याही क्षेत्रात ज्या लोकांमध्ये स्पर्धा आहे त्यांना गुणवत्तेच्या दृष्टीने एका पातळीवर आणणे आवश्यक आहे. त्या पुढे म्हणाल्या, आयुष्यातील कौतुकाचे क्षण पकडून ठेवायचे असतात. ते पुरस्काराच्या रूपानेच आलेले असतात असे नाही.
सत्काराला उत्तर देताना डॉ. वर्षा तोडमल म्हणाल्या, करम प्रतिष्ठानचा मानाचा पुरस्कार मिळाल्याचा मनस्वी आनंद आहे. त्या पुढे म्हणाल्या, कुठलीही कला साकारणे सोपे नाही. नवनिर्मितीसाठी कलाकार, साहित्यिकाची भावतंद्री लागावी लागते. त्यातूनच माणूसपणाचा आनंद मिळत जातो. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चांगल्या साहित्याची निर्मिती व्हायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. उमा कुलकर्णी यांचा सत्कार भूषण कटककर व प्रज्ञा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला तर परिचय वैजयंती विंझे-आपटे यांनी करून दिला. सन्मानपत्राचे वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासंती वैद्य यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन व गझल संमेलन आयोजन करण्यात आले होते. कविसंमेलनात चंचल काळे, अनुराधा काळे, डॉ. दाक्षायणी पंडित, अश्विनी देशपांडे, माधुरी डोंगळीकर, अश्विनी जगताप, ऋचा कर्वे, मुक्ता भुजबले तर गझल संमेलनात मिलिंद छत्रे, शांताराम खामकर, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनवणे, सुजाता पवार, वर्षा कुलकर्णी, मसूद पटेल, डॉ. मंदार खरे, प्राजक्ता वेदपाठक आणि वैजयंती विंझे-आपटे यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले.