श्री शनी मारुती बाल गणेश मंडळातर्फे न्याय वैद्यक विभागातील कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता
पुणे : श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्टतर्फे आज (दि. 13) ससून रुग्णालयातील न्याय वैद्यक विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन दिवाळीनिमित्त त्यांना फराळाचे वाटप करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
रुग्णालयातील न्याय वैद्यक विभागात हा अनोखा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांची प्रमुख उपस्थिती होती. न्याय वैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. नरेश झंझाड, श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दीपक निकम, अध्यक्ष सचिन पवार, डॉ. हेमंत वैद्य, विश्वास भोर मंचावर होते. मान्यवरांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचा यशोचित गौरव करून त्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.
सुरुवातीस मंडळाचे अध्यक्ष सचिन पवार यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या उपक्रमाची माहिती दिली. मंडळाच्या या विधायक कार्याचा गौरव करून डॉ. मिलिंद भोई म्हणाले, न्याय वैद्यक विभागातील कर्मचाऱ्यांचे काम खूप उपयुक्त आहे, पण त्यांच्या कार्याकडे समाजाचे कधी लक्ष जात नाही. मंडळाने खऱ्या अर्थाने समाजातील मोती शोधून त्यांचा गौरव केला आहे. हे खरेतर ईश्वरीय कार्य आहे.
डॉ. नरेश झंझाड म्हणाले, मृत व्यक्तिच्या शरीरावरील जखमा आमच्याशी बोलतात. त्याच्या नोंदी करून आमचा विभाग अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. न्याय वैद्यक विभागातील कर्मचारी रामदास सोळंकी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. झंझाड यांचा सत्कार डॉ. भाई यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वेश पवार यांनी केले. या वेळी पियूष शहा, सागर पवार, मंडळाचे कार्यकर्ते दिनेश पेंढारे, सुनील तेलंग, राहुल मारणे, दीपक कदम, गणेश मोरे, प्रवीण पेंढारे, संजय घाणेकर, वैभव दिघे आदी उपस्थित होते.