कमांडर दिवाळी अंकाचा हॉलीवुड चित्रपट विशेषांक प्रकाशित
‘कमांडर या अंकाचा Hollywood चित्रपट विशेषांकात गाजलेल्या हॉलिवुड चित्रपटांची अतिशय रंजक माहिती आहे, त्यामुळे हा अंक वाचनीय तसंच दर्जेदार’ असल्याचं जेष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी म्हटलं आहे.
या दिवाळी अंकाचं प्रकाशन नुकतंच बोरिवली इथे एका छोटेखानी समारंभात नलावडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास अंकाचे मानद संपादक डॉ. राजू पाटोदकर, ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर, बोरिवली नाट्य परिषद शाखेच्या कार्यकारिणी सदस्य सुप्रिया चव्हाण, एचडीएफसी बँकेचे पुणे येथील उपाध्यक्ष विजय गोरासिया, सहसंपादक नयना रहाळकर, लेखक मल्हार दामले, अंकाचं मुखपृष्ठ साकारणारे कौस्तुभ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते
“अंकाचं 27 वर्षांचं सातत्य आणि चित्रपट विषयक बहुमोल अशी माहिती हे देखील आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे”, असंही श्री नलावडे यावेळी म्हणाले.
‘श्वास’ या चित्रपटाने ऑस्कर हॉलीवुड वारी केली होती तेव्हाचे अनुभवही श्री नलावडे यांनी सांगितले.
सिने क्षेत्राची आवड असणारा महाराष्ट्रात मोठा वर्ग — दिलीप ठाकूर
“महाराष्ट्रात सिने क्षेत्राची आवड असलेला आणि या रंगीबेरंगी जगताबद्दल वाचणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कमांडर हा दिवाळी अंक जणू मेजवानीच आहे. भरपूर असा वाचनीय मजकूर यात असतो. या राज्यस्तरीय अंकास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा”, असे मनोगत ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर यावेळी म्हणाले.
‘गेल्या २७ वर्षांपासून मुख्य संपादक प्रा. डॉ. संजय पाटील – देवळाणकर यांच्या मार्गदर्शनात कमांडर तयार होत आहे. दर वर्षी एखादा विशिष्ट विषय घेऊन त्यावर संपूर्ण अंक प्रकाशित करणं हे ‘कमांडर’चं खास वैशिष्ट्य. या वर्षी एक नवीन प्रयोग म्हणून जागतिक पातळीवर गाजलेले, लोकप्रिय ठरलेले चित्रपट अर्थातच ‘Hollywood चित्रपट विशेषांक’ ‘कमांडर’ने प्रकाशित केला आहे. गेल्या शतकातील उत्तमोत्तम अशा हॉलीवुडच्या चित्रपटांची मराठीतून माहिती देऊन अंक सजवण्यात आला’ असल्याची माहिती सहसंपादक नयना रहाळकर यांनी दिली.
अंतरंग
या अंकात अरविंद औंधे (रोमन हॉलिडे), दीपक खेडकर (जॉज्), दिलीप ठाकूर (हॉलीवुडवर आधारित बॉलीवुड), शशांक म्हसवडे (द हॉलिडे), सुवर्णा बेडेकर (गॉन विथ द विंड), दीपक सातपुते (गॉड फादर), श्रीनिवास बेलसरे (बेन हर), डॉ. वि. ल. धारुरकर (मॅकेनाझ गोल्ड), सुरेश वांदिले (हॅरी पॉटर), विस्मया परांजपे (शिंडलर्स लिस्ट), मल्हार दामले (एव्हेंजर्स), केदार पाटणकर (जेरी मॅकग्युअर), सचिन परांजपे (द इंटर्न), रविंद्र देवधर (बेबीज डे आऊट), अर्चना शंभरकर (स्पायडरमॅन), सना पंडित (ॲन अफेअर टू रिमेंबर व वॉल्ट डिस्ने सिनेमा), अपर्णा कुलकर्णी (प्रिटी वुमन), मिनू मुजुमदार (हॉलीवूड सिनेमा तांत्रिक बाजूने), सुधीर सेवेकर (बायसिकल थीव्हज), प्रकाश राणे (ज्युरासिक पार्क), सायली वैद्य (टॅक्सी ड्रायव्हर), श्रीकांत कुलकर्णी (रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क), धनंजय कुलकर्णी (ऑक्टोपसी), डॉ. जयश्री सोन्नेकर (दि डीप ब्ल्यू सी व किंग काॅंग), डॉ. शुभांगी तिवारी (द ब्रिजेस ऑफ मिडसन कंट्री), श्रीकांत सराफ (कॅसान्ड्रा क्रॉसिंग), रमेश धनावडे (टायटॅनिक), डॉ. राजू पाटोदकर (हॉलीवूडची पंढरी मु.पो. लॉस एंजेलिस व तेथील युनिवर्सल स्टुडीओचा फेरफटका यांचा On The Spot रिपोर्ट), सुधीर ब्रह्मे (बॅटलशिप पोटेमकीन)तसेच आभास आनंद, हेमंत लब्धे, इर्शाद बागवान, आशिष निनगूरकर, देवेंद्र प्रभुणे, गिरीश दीक्षित, अनिल तोरणे या इतर मान्यवरांचे लेख आहेत.