Thursday, September 3, 2026
Latest NewsMAHARASHTRASportsTOP NEWS

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : संभाव्य विजेत्या सिंकदर शेख, शिवराज राक्षेची आगेकूच

पुणे – महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेतील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी गटातून संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या शिवराज राक्षेने गादी, तर सिंकदर शेखने माती विभागातून आपली आगेकूच कायम राखली. या दोघांच्याही लढतींकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून, त्यांनी पाचव्या फेरीत प्रवेश केला आहे.

प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये सुरु आहे.

गादी विभागातील लढतीत शिवराजने कमालीचा आक्रमक पवित्रा घेत जयसिंगला तांत्रिक आघाडीवर १०-० असे पराभूत केले. पहिल्या १० सेकंदातच दोन गुणांची कमाई करताना त्याने आपले मनसुबे स्पष्ट केले. त्यानंतर दुहेरी पट आणि भारंदाज डावाचा वापर करून आपली आघाडी झटपट वाढवत जयसिंगला प्रतिकाराची संधीच दिली नाही.

सिंकदरने देखील आपला वेगवान आणि चपळ कुस्ती खेळण्याचा लौकिक कायम राखताना धुळ्याच्या रितीक राजपूत चे आव्हान अगदी सहज परतवून लावले. बगलडुप डावाने सुरुवात करताना सिंकदरने नंतर भारंदाज आणि दुहेरी, तसेच एकेरी पटाचेही डाव खेळत झटपट गुणांची वसूली केली.

या गटातील अन्य लढतीत साताऱ्याच्या तुषार ठोबरेने मुंबईच्या बालाजी मेटकर, तर मुंबई शहरच्या विक्रम भोसलेने ठाण्याच्या प्रशांत शिंदेचा पराभव करून माती विभागातून आगेकूच कायम राखली.

दरम्यान, गादी विभागातील ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत बीडच्या आतिश तोडकरने आपला लौकिक कायम राखताना आणखी एक लढत एकतर्फी जिंकताना आपले वर्चस्व राखले. आतिशने ५७ किलो लवजनी गटात गादी विभागातून अंतिम फेरी गाठताना ओंकार शिर्केचा तांत्रिक १०-० अशा आघाडीवर पराभव केला. विजेतेपदासाठी त्याची गाठ आता सोलापूरच्या आकाश सरगरशी पडणार आहे. आकाशने पहिल्या फेरीतच पिंपरी चिंचवडच्या प्रणव सस्तेवर ६-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीसाठी प्रणव मॅटवर आलाच नाही. त्यामुळे आकाशला विजयी घोषित करण्यात आले.

स्पर्धेतील ७४ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत पुण्याच्या अनिल कचरेने जालन्याच्या पवन बावणेचा १३-३, तर गडचिरोलीच्या संदेश शिपमुळेने कोल्हापूरच्या आकाश कपडेचा ७-१ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

माती विभागातील ५७ किलो वजनी गटात कृष्णा हरणावळने अंतिम फेरी गाठताना साताऱ्याच्या विशाल रुपनरचा १८-८ आणि सोलापूरच्या सौरभ इगवेने पुणे शहरच्या अभिजित शेडगेचा १०-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

अंकुश माने (७९ किलो), लखन म्हात्रे (७९ किलो), सुदर्शन पाटील (९२ किलो), राम धायगुडे (८६ किलो), सचिन दाताळ (६५ किलो) यांनी आपल्या मोहिमेस विजयी सुरुवात केली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading