बीजमाता राहीबाई पोपेरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पुणे. ९- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाद्वारे मंगळवारी पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भारत सरकारने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. त्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अल्ताफ हुसेन नदाफ उपस्थित होते.
यावेळी बोलताना ‘बीजमाता’ पद्मश्री राहीबाई ह्यांनी त्यांचा अत्यंत गरीब परीस्थितीतील संघर्षाचा तसेच पद्मश्री पर्यंतचा जीवनपट उलगडला. त्यांनी मातीचे आरोग्य, सेंद्रिय शेती, गावरान बियाणे आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. याप्रसंगी डॉ. गोसावी ह्यांनी राहीबाईंचा ‘संवर्धन’ हा गुण आत्मसात करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. यावेळी राहीबाई यांचा कुलगुरूच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केंद्राच्या समन्वयक डॉ. हेमलता कोतकर यांनी केले तर प्रा. मिलिंद सरदेसाई ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले.